भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि १९८३ चा विश्वचषक जिंकवणारे कपिल देव यांनी २३ मार्च १९९४ रोजी निवृत्ती घेतली. त्या वेळी त्यांच्या नावावर ४३४ टेस्ट विकेटांचा विक्रम होता. हा विक्रम कधी मोडेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
परंतु क्रिकेटमधील प्रत्येक विक्रम कधीतरी मोडण्यासाठीच असतो. कपिल देव यांच्या निवृत्तीनंतर नेमके १० वर्षांनी अनिल कुंबळे यांनी हा विक्रम मोडला.
भारतीय संघाचा २००४ मध्ये बांग्लादेशचा दौरा झाला. १० डिसेंबर रोजी ढाका येथे पहिला टेस्ट सामना सुरू झाला आणि १३ डिसेंबर रोजी समाप्त झाला. भारताने हा सामना डावाने आणि १४० धावांनी जिंकला.
हा सामना केवळ भारताच्या विजयासाठीच नव्हे, तर अनिल कुंबळे यांनी कपिल देव यांचा सर्वाधिक टेस्ट विकेटांचा विक्रम मोडण्यासाठी प्रसिद्ध ठरला.
ढाका टेस्टच्या पहिल्याच दिवशी मोहम्मद रफीक याला बाद करून कुंबळे यांनी आपला ४३५ वा टेस्ट विकेट घेतला. पारीत कुंबळे यांनी २ आणि सामन्यात एकूण ४ विकेट घेतल्या.
अनिल कुंबळे यांनी आपल्या ९१ व्या टेस्टमध्ये ४३५ विकेटांचा टप्पा गाठला, तर कपिल देव यांनी १३१ टेस्टमध्ये ४३४ विकेट घेतल्या होत्या.
त्या टेस्टमध्ये इरफान पठाणने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट घेतल्या. एकूण ११ विकेट मिळवल्यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
अनिल कुंबळे यांनी २ नोव्हेंबर २००८ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. ते भारताच्या वतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत.
कुंबळे यांनी १३२ टेस्टमध्ये ६१९ आणि २७१ वनडेमध्ये ३३७ विकेट घेतल्या आहेत.
सर्व फॉरमॅट मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुंबळे मुरलीधरन, वॉर्न आणि अँडरसन यांच्या नंतर चौथ्या स्थानावर आहेत. टेस्ट क्रिकेटच्या यादीतही त्यांची हीच क्रमवारी आहे.
