मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आता उमेदवार निश्चित करण्याचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. ३० डिसेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. अनेक इच्छुकांना उमेदवारी हवी आहे, त्यातून नेत्यांमध्येही चकमकी घडत आहेत. उबाठा शिवसेनेच्या वांद्रे येथील उमेदवारीवरून मातोश्रीवर अशीच खडाजंगी झाली.
उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक आणि वांद्र्याचे आमदार असलेले वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती नेते मानले जाणारे अनिल परब यांच्यात हा खटका उडाला. दोघांनाही आपापल्या उमेदवारांना तिकीट द्यायचे असल्यामुळे त्यांच्यात हा संघर्ष झाला आणि त्यातून परब यांना अपेक्षित असलेल्या उमेदवाराला तिकीट न मिळाल्याने परब यांचा पारा चढला.
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. रविवारी रात्री मातोश्रीवर बोलवून काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. अनिल परब या खडाजंगीनंतर तडक बैठक सोडून निघून गेल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची होती, त्यांना रात्री मातोश्रीवर बोलवून घेण्यात आले होते. रात्री अडीच वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप आणि बैठकांचे सत्र सुरु होतं. या दरम्यान वांद्र्यातील एका उमेदवारीवरुन अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाले.
हे ही वाचा:
गुणवत्ता तपासणीसाठी १०८ लॅब्सना मंजुरी
आयबीसीमध्ये सुधारणा केल्याने कर्ज वसुलीत आराम
उन्नाव बलात्कार प्रकरण: सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे पीडिता समाधानी
दिल्लीत मंत्री आशीष सूद यांनी स्वच्छता व्यवस्थेची केली पाहणी
वॉर्ड क्रमांक ९५ च्या उमेदवारीवरुन हे नाराजी नाट्य रंगले. वॉर्ड क्रमांक ९५ मधून हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. श्रीकांत सरमळकर हे जुने शिवसैनिक आणि नेते होते. पण हरी शास्त्री यांना उमेदवारी द्यायला अनिल परब यांचा विरोध होता. मात्र वरुण सरदेसाई हे शास्त्री यांच्यासोबत होते.त्यावरून परब आणि सरदेसाई यांच्यात चकमक झाली. त्यानंतर अनिल परब तडक मातोश्रीवरुन निघून गेले.
वरुण सरदेसाई हे वांद्रयातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सिद्दीकी यांचा पराभव केला होता. तर अनिल परब हे विधान परिषदेतून आमदार आहेत.
उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात युती झाल्याचं जाहीर केलं आहे. मात्र अद्याप उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाहीत. एबी फॉर्म मात्र वाटले जात आहेत. बंडखोरी, नाराजी टाळण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करत आहेत.
