प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांनी साश्रु नयनांनी आशा भोसले याना सोमवारी अलविदा केले.
संपूर्ण शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांचे पार्थिव त्यांच्या दक्षिण मुंबईतील घरातून शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. फुलांनी सजवलेल्या रथातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला असून संपूर्ण चित्रपट आणि संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा:
झांसीत हिंदू विद्यार्थिनींना धर्मांतरित करू पाहणारा शिक्षक सोहेलला अटक
अयोध्या राम जन्मभूमी मंदिरातील ‘ज्योती स्वरूप’वरून वाद
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये पोलिओ पथकाला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांवर हल्ला
पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाण सीमेजवळ चीनचा नवा प्रांत
आशा भोसले यांना शनिवार, ११ एप्रिलच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. मात्र, त्यांच्या नात जनाई भोसले यांनी सांगितले होते की आजीला जास्त थकवा आणि छातीत इन्फेक्शन आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते आणि त्या लवकर बऱ्या होतील.
मात्र, रविवारी १२ एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
१३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासूनच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी जमू लागली. ए. आर. रहमान, सचिन तेंडुलकर, तब्बू, राकेश रोशन, सुदेश भोसले, जावेद अली, नितीन मुकेश आणि नील नितीन मुकेश यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अंत्यसंस्कारापूर्वी आशा भोसले यांना राजकीय सन्मान देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा पांघरण्यात आला. बंदुकांच्या फैरी झाडून आशाताईंना सलामी देण्यात आली.
स्मशानभूमीत आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आमिर खान आणि विकी कौशल, रमेश सिप्पी, विवेक ओबेरॉय, सुदेश भोसले, धुरंधर फेम रणवीर सिंह, पद्मिनी कोल्हापुरे, तब्बू, गायक शान, जावेद अली, क्रिकेटपटू मोहम्मद सिराज, जॅकी श्रॉफ, सुभाष घई अशी चित्रपट व क्रीडा क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
अमिताभ बच्चन आशा भोसले यांच्या निधनाने खूप व्यथित झाले. त्यांनी भावनिक पोस्टमध्ये लिहिली. गायक दलेर मेहंदी यांना अश्रू आवरत नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित होते.