मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात भाजपाने पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याचा मान मिळविला. त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जास्त जागा लढवूनही २९ जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी प्रमुख उमेदवार पराभूत झाले. प्रभादेवीत सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांना हार पत्करावी लागली. मात्र त्यानंतर आता त्या भागातील वादविवाद चव्हाट्यावर आले आहेत. समाधान सरवणकर यांनी आपल्याला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांकडून कोणतीही मदत झाली नाही, असा आरोप केला आहे. त्यावरून या विभागातील सुंदोपसुंदी समोर आली आहे.
दादर–प्रभादेवी परिसरात जे चित्र समोर आले आहे, ते केवळ समाधान सरवणकर यांच्या पराभवापुरते मर्यादित नाही. हे चित्र महायुतीतील अंतर्गत संघर्ष, भाजपमधील एका प्रभावी गटाचा कारभार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवण्याचा सुनियोजित कट आहे का, अशी चर्चा केली जात आहे. प्रभादेवी–दादर भागातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून, भाजपमधील एका स्थानिक गटाने रचलेला डाव असल्याचा गंभीर आरोप सरवणकर यांनी केला आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सॲपवर मेसेज फिरवले, असे बोलले जाते. या मेसेजमधून “सरवणकरांना मदत करू नका” असे स्पष्ट संकेत दिल्याचा आरोप आहे. हे संकेत वरच्या पातळीवरून आल्याचा भास निर्माण करण्यात आला. कार्यकर्त्यांची दिशाभूल झाली. बूथवर काम करणाऱ्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मते विभागली गेली आणि उमेदवार पराभूत झाला, असा दावा करण्यात येतो.
इतकेच नव्हे, तर एक व्हायरल व्हॉट्सॲप मेसेज समोर आला आहे, ज्यात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलल्याशिवाय जर माजी आमदार किंवा त्यांची मुलगी फोन करत असेल तर त्यांना मदत करू नका, असे लिहिले आहे. युती असली तरी वॉर्डमधील कार्यकर्त्यांना सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकरांना मदत करू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. सदा सरवणकर वरिष्ठांचा अपमान करतात, असा उल्लेख करत जिल्ह्यातून फोन आला तर माझं नाव सांगायचं, अशी भाषा त्या मेसेजमध्ये वापरण्यात आली आहे. ही भाषा थेट युतीविरोधी आणि उमेदवार पाडण्यासाठीच वापरल्याचे बोलले जाते.
या संपूर्ण प्रकरणात खळबळजनक चर्चा पैशांभोवती फिरते. या निवडणुकीसाठी खर्च करण्याकरिता जे पैसे दिले गेले त्या पैशांवरून संबंधित व्यक्तींमध्ये वाद झाला, अशी माहिती समोर येत आहे.
प्रभादेवीतील काही पदाधिकारी सतत पैशांसाठी मागे लागले होते, असे बोलले जाते. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी सुरूच होती. पुढे पैसे मिळू शकणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर विरोधात काम सुरू झाले, असा आरोप करण्यात येतो. अल्प फरकाने झालेल्या पराभवात अशा प्रकारे मतं फिरवण्यात आली, असा दावा पुढे येतो. त्यामुळे हा पराभव योगायोग नव्हता, तर नियोजनाचा भाग होता, असे बोलले जात आहे.
महायुतीतलाच नव्हे तर भाजपातील अंतर्गत कलह देखील यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत.
जुने भाजप कार्यकर्ते, संघ परिवाराशी जोडलेले लोक आणि निष्ठावंत बूथ प्रमुख यांना या निवडणुकीत जाणीवपूर्वक बाजूला सारण्यात आल्याचा आरोप आहे. कसे काम करायचे याबाबत कोणतेही निर्देश किंवा मेसेज त्यांना देण्यात आले नाहीत, अशी खात्रीलायक माहिती आहे. संघ परिवारातील कार्यकर्त्यांना कोणतीही माहिती देण्यात आली नाही. उलट जुने पदाधिकारी आणि बूथ प्रमुख बदलण्यात आले, कारण त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, असे सांगितले जाते.
या संपूर्ण प्रकाराची तक्रार जिल्हाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष आणि पक्षाच्या वरिष्ठांकडे करण्यात आली होती. तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आहे. त्यामुळे पक्षालाच दादर, माहीम आणि प्रभादेवीत भाजप वाढवायची आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपमधून बाहेर पडलेले काही नेते उघडपणे म्हणत आहेत की दादरमध्ये भाजप वाढू नये, तिथे भाजपचा आमदार येऊ नये, अशी इच्छा असलेले काही नेते आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून हे सगळे घडवले जात आहे.
हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीतही दिसून आला होता, असा दावा केला जातो. त्या वेळीही युतीच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न झाला होता. काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांबरोबर काम केल्यास विरोधात काम केले जाईल आणि उमेदवार पाडला जाईल, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. म्हणजे भाजपमधील एका गटाचे ऐकले नाही, तर उमेदवार पाडला जाईल, अशी परिस्थिती तयार करण्यात आली होती.
या गटाने थेट मनसेला मतदान करण्याचे संकेत दिल्याचे आरोपही समोर येत आहेत. काही वॉर्डात मनसेला मतदान करा, असे सांगण्यात आल्याची चर्चा आहे. काही जुन्या भाजप कार्यकर्त्यांना तसे फोन आल्याचेही बोलले जाते. RSS आणि भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला असून तसे ऑडिओदेखील समाजमाध्यमात फिरत आहेत.
जिथे जिथे हा गट फिरला तिथे तिथे उमेदवार पराभूत झाला, असा दावा जुने पदाधिकारी करत आहेत. काही मतदारसंघात या लोकांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आले आणि तिथे उमेदवार जिंकले, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
या सगळ्या प्रकारामुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक बूथ प्रमुख, माजी वॉर्ड अध्यक्ष, माजी उपविभागप्रमुख आणि पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. पक्षाला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजून चालवणाऱ्या लोकांबरोबर राहायचे नाही, अशी भूमिका घेतली जात आहे.
या पार्श्वभूमीवर समाधान सरवणकर यांनी संबंधित व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप गोळा केल्याचे सांगितले आहे. ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हा केवळ एका वॉर्डचा प्रश्न नाही, तर दादर, माहीम आणि प्रभादेवीतील भाजपमधील एका टोळीच्या कारभाराचा पर्दाफाश असल्याचे चित्र सध्या उभे राहत आहे, अशी तिखट भाषा सरवणकर यांनी वापरली आहे.
समाधान सरवणकर यांच्या आरोपांनंतर स्थानिक भाजपा नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. समाधान सरवणकर यांनी जे वक्तव्य केलं ते निर्लज्जपणाचं नीचपणाचं वक्तव्य आहे. त्यांना पाहून आम्ही राजकारण करतोय. अपमान करण्यासाठी काहीही बोलणार तर चालणार नाही. यांच्याकडे पक्ष शिस्त नाही. दादरमध्ये भाजपला जागा दिली असती तर २०० टक्के जागा भाजप जिंकली असती, असं त्या म्हणाल्या आहेत.
या निवडणुकीनंतर महायुतीत ठिणगी पडल्याचे बोलले जात असताना भाजपातही गटबाजी आहे, याचीही चर्चा आहे. पण या विभागात आता महायुतीचा आमदार नाही, खासदार नाही आणि आता नगरसेवकही नाही. या सगळ्या वादविवादांपायी महायुतीच्या हातून हा विभाग निसटून गेल्याची चर्चा होत आहे.
