हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे सोमवारी निधन झाले. ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांना श्वास घेताना अडचण येत होती आणि त्यांची तब्येत सतत बिघडत होती. नियमित तपासणी आणि उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
काही दिवसांपर्यंत उपचार घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडासा सुधार झाला आणि त्यांना घरी आणण्यात आले, जेणेकरून त्यांच्यावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत उपचार करता येतील. त्यांच्या घरी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली होती, परंतु त्यांची तब्येत हळूहळू अधिक कमजोर होत गेली.
विलेपार्ले येथील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांत प्रमुख भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आमिर खान, सलमान खान, अक्षयकुमार या अभिनेत्यांनी स्मशानभूमीत धर्मेंद यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. सनी देओल यांनी धर्मेंद्र यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
हे ही वाचा:
कॉलेस्टेरॉल कमी करायचंय? मग प्या जास्वंदाचा चहा!
मलेशियात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी?
“अरुणाचल प्रदेश चीनचा भाग” म्हणत शांघाय विमानतळावर भारतीय महिलेला रोखले
पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक
श्वास घेण्याच्या अडचणींबरोबरच धर्मेंद्र यांना इतर अनेक वयोमानानुसार उद्भवणाऱ्या समस्या होत्या. रुग्णालयात आणि घरी सतत उपचार आणि देखरेख असूनही त्यांची प्रकृती गंभीरच राहिली. कुटुंबीय सतत त्यांची काळजी घेत होते. त्यांच्या घरी रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळू शकेल. त्यांच्या तब्येतीबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेकजण सतत संपर्कात होते. सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी रुग्णालयात आणि घरात भेट देऊन धर्मेंद्र यांची तब्येत जाणून घेतली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली.
धर्मेंद्र यांचा हिंदी सिनेमातील कारकिर्दीचा प्रवास जवळपास सहा दशकांचा होता. त्यांना बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांनी ‘शोला और शबनम’, ‘अनपढ़’, ‘बंदिनी’, ‘पूजा के फूल’, ‘हकीकत’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’, ‘खामोशी’, ‘प्यार ही प्यार’, ‘तुम हसीन मैं जवां’, ‘सीता और गीता’, ‘यादों की बारात’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले. २०१२ मध्ये भारत सरकारतर्फे देण्यात येणारा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच त्यांनी अनेक फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले. त्यांच्या योगदानामुळे त्यांना बॉलिवूडमधील सर्वात महान आणि आदरणीय अभिनेत्यांपैकी एक मानले जाते.
