विख्यात वैज्ञानिक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते डिजिटल साक्षरता क्षेत्रातील कार्यकर्ते आणि ६४ पुस्तकांचे लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले.
डॉ. शिकारपूर यांनी अनेक वर्षांपासून दृष्टिहीनांसाठी ज्ञानसाक्षरता आणि कौशल्यविकास या क्षेत्रात कार्य केले आहे. ते आपली अनेक पुस्तके आणि साहित्य ब्रेल लिपीत रूपांतरित करून राज्यातील अंधशाळांना मोफत वितरित करत असतात.
या कार्याची दखल घेत नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड्स या संस्थेने विश्व पुस्तक दिन २४ एप्रिल २०२४ रोजी त्यांना विशेष सन्मानपत्र प्रदान केले होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता हे कौशल्य आज सर्वांसाठी अत्यावश्यक ठरत असताना, दृष्टिहीन व्यक्तींना या क्षेत्रातील शिक्षणात मर्यादा भासतात, हे लक्षात घेऊन डॉ. शिकारपूर यांनी आपले AI पुस्तक ब्रेल स्वरूपात उपलब्ध करून दिले. या पुस्तकात AI च्या विविध शाखा, त्याचा व्यवसाय, दैनंदिन जीवन, साहित्य-प्रकाशन क्षेत्र इत्यादीवर होणारा परिणाम यांचे सोप्या भाषेत वर्णन आहे. तसेच शेतकरीही AI तंत्रज्ञानाचा वाढता वापर करत आहेत, यावर स्वतंत्र प्रकरण समाविष्ट केले आहे.
हे ही वाचा:
हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…
“केंद्राने जबरदस्ती हिंदी थोपवली, तर तामिळनाडू भाषा युद्धासाठी सज्ज”
श्रीराम मंदिराच्या चित्ताकर्षक सुशोभीकरणाने लक्ष वेधले
राम मंदिरावरील धर्मध्वजाबद्दल जाणून घ्या ‘या’ विशेष गोष्टी!
प्रकाशन कार्यक्रमात बोलताना डॉ. माशेलकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, “समावेशन आणि टिकाऊपणा ही मानवजातीसमोरील सर्वात मोठी आव्हाने आहेत. डॉ. शिकारपूर यांचा हा उपक्रम ज्ञानसमावेशकतेकडे महत्त्वाचे पाऊल आहे.”
यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड्सच्या प्रवक्त्या सकीना बेदी यांनी सांगितले की, डॉ. शिकारपूर यांची पुस्तके राज्यातील सर्व वयोगटातील दृष्टिहीन व्यक्तींसाठी ज्ञानाचा अत्यंत मौल्यवान स्रोत ठरत आहेत.
