९० फूट खोल विहिरीत कार कोसळली; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

अंत्यविधीहून परतताना काळाचा घाला

९० फूट खोल विहिरीत कार कोसळली; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध-वालसावंगी मार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील क्रेटा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तब्बल ९० फूट खोल विहिरीत कोसळली. या कारमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असे चार जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक शेतकरी, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत दोन्ही पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आले; मात्र दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी हे सर्वजण गेले होते. अंत्यविधी आटोपून धावडा गावाकडे परतत असताना रात्री सुमारे आठच्या सुमारास कार अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळली. कारमधील ४५ वर्षीय सुलताना बेगम जीआउल्ला खान यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. तर ७५ वर्षीय अख्तरबी खान या विहिरीत कारमध्येच अडकून राहिल्या.
हे ही वाचा:
कुणी जमीन देता जमीन?

पोलिस केसमध्ये अडकवण्याच्या धमकीतून कायदा पदवीधराची आत्महत्या

“गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी”

जुनेदची बिर्याणी झारखंडमध्ये का चालली नाही ?

विहीर तब्बल ९० फूट खोल असल्याने बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. अंधार, विहिरीची खोली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रशासन व बचाव पथकासमोर मोठे आव्हान होते. तब्बल १५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. त्यासोबतच अख्तरबी खान यांचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे धावडा परिसरासह संपूर्ण भोकरदन तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version