भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’

ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या एल-७० एडी तोफेची केली पाहणी 

भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीनिमित्त भूज लष्करी तळावर शस्त्र पूजा केली.  या कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी तसेच दक्षिणी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभात ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी एल-७० एअर डिफेन्स (एडी) तोफ आणण्यात आली होती.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान, एल-७० एअर डिफेन्स गनने अपवादात्मक कार्यक्षमता दाखवली. प्रति मिनिट ३०० राउंड फायर करू शकणारी आणि ३,५०० मीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकणारी ही तोफ पाकिस्तानी ड्रोनना पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले, “दहशतवाद असो किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या, आज आपल्याकडे ती हाताळण्याची आणि पराभूत करण्याची क्षमता आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने लेह ते सर क्रीकच्या या भागापर्यंत भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसखोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेला पूर्णपणे उघड केले आणि जगाला संदेश दिला की भारताचे सशस्त्र दल कधीही, कुठेही आणि कसेही पाकिस्तानचे मोठे नुकसान करू शकतात.”

भूज लष्करी तळावर शस्त्रपूजेपूर्वी संरक्षण मंत्री सैनिकांना संबोधित करत होते. ते असेही म्हणाले की, “जेव्हा आपण शस्त्राची पूजा करतो तेव्हा आपण या शक्तीचा वापर केवळ धर्म आणि न्यायाच्या रक्षणासाठी करण्याची प्रतिज्ञा करतो. भगवान राम यांनी त्यांच्या जीवनात हा संकल्प दाखवला. जेव्हा त्यांनी रावणाशी लढाई केली तेव्हा त्यांच्यासाठी ते युद्ध केवळ विजयाचे साधन नव्हते, तर धर्म स्थापित करण्याचे साधन होते. ”

“महाभारत युद्ध भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली लढले गेले तेव्हाही त्याचा उद्देश पांडवांचा विजय सुनिश्चित करणे नव्हता तर धर्माची स्थापना करणे हा होता. शस्त्रांची पूजा हे दर्शवते की भारत केवळ शस्त्रांची पूजा करत नाही तर वेळ आल्यावर त्यांचा वापर कसा करायचा हे देखील जाणतो,” असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version