धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज

पुढील उपचार घरीच सुरू राहणार असल्याची माहिती

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून डिस्चार्ज

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर धर्मेंद्र यांना जुहू इथल्या त्यांच्या घरी नेण्यात आले असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी नेण्यात आले. डिस्चार्जच्या वेळी त्यांचा मुलगा बॉबी देओल उपस्थित होता. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या बऱ्याच काळापासून चिंताजनक आहे. सोमवारी दुपारपासूनच त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक चिंता व्यक्त करण्यात येत होती. ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती वारंवार त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येत होती. यानंतर आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वी धर्मेंद्र यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता. “मीडिया अतिरेक करत असल्याचं दिसतंय आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत. आम्ही सर्वांना विनंती करतो की आमच्या कौटुंबिक खासगीपणाचा आदर करावा. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते,” अशी पोस्ट ईशा देओलने लिहिली होती.

हे ही वाचा:

दिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

फक्त ५५ धावांत कोसळली दक्षिण आफ्रिका!

ईडन गार्डन्सवर इतिहास घडणार!

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात ते आपला ९० वा वाढदिवस साजरा करणार आहेत.

Exit mobile version