‘धुरंधर २’ कडून चार दिवसांत ६०० कोटींचा टप्पा पार!

भारतात चित्रपटाने ४५४.१२ कोटी रुपये कमावले

‘धुरंधर २’ कडून चार दिवसांत ६०० कोटींचा टप्पा पार!

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत पहिल्याच विकेंडला इतिहास रचला आहे. रणवीर सिंग याची मुख्य भूमिका असलेल्या या स्पाय थ्रिलर चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असून आता तो वेगाने १००० कोटी क्लबकडे वाटचाल करत आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाची जागतिक कमाई सुमारे ६९१.३२ कोटी रुपयांपर्यंत झाली आहे. तर भारतात या चित्रपटाने ४५४.१२ कोटी रुपये (नेट) कमावले आहेत. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर हा आकडा सहज ७०० कोटींच्या पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये ‘गदर 2’ (६९२.३ कोटी), ‘जेलर’ (६०७.३ कोटी) आणि ‘सालार’ (६१४.६ कोटी) यांच्या लाइफटाइम कलेक्शनचाही समावेश आहे. रविवारीच या चित्रपटाने ११४.८५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली, जी त्याच्या दमदार विकेंडची साक्ष देते.

भारतामधील ‘धुरंधर’चे नेट कलेक्शन:

एकूण: ४५४.१२ कोटी

आता या चित्रपटाचे लक्ष्य ‘पीके’ (७५०.३ कोटी), ‘छावा’ (७८८.६ कोटी) आणि ‘स्त्री 2’ सारख्या मोठ्या विक्रमांवर आहे. ज्या वेगाने चित्रपट कमाई करत आहे, त्यावरून तो लवकरच १००० कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल, असे दिसत आहे. परदेशी बाजारातही चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेषतः अमेरिका आणि कॅनडामध्ये त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून तेथून आतापर्यंत सुमारे १४९.३५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. जर हीच कमाईची गती कायम राहिली, तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ केवळ १००० कोटी क्लबमध्येच प्रवेश करणार नाही, तर आपल्या पहिल्या भागाच्या १३०७.३५ कोटी रुपयांच्या विक्रमालाही मागे टाकू शकतो आणि भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान मिळवू शकतो.

या चित्रपटात रणवीर सिंग यांच्यासह आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. उत्कृष्ट कमाईसोबतच हा चित्रपट आपल्या कथानक, थीम, संगीत आणि राजकीय संकेतांमुळेही चर्चेत आहे, त्यामुळे तो केवळ बॉक्स ऑफिसपुरताच मर्यादित न राहता सामाजिक पातळीवरही चर्चेचा विषय ठरत आहे.

Exit mobile version