हे ही वाचा:
१० वर्षांच्या डेटिंगनंतर शिलादित्यने श्रेया घोषालला कसं केलं होतं प्रपोज?
कॅप्टनचा आदेश: षटकार लागत राहू द्या
ड्रेसिंगरूम तापलं! गंभीर विरुद्ध हार्दिक – नेमकं काय घडलं?
केरळच्या पहिल्या महिला डीजीपीने निवडणूक जिंकली
मुंबईच नाही, तर अवघ्या देशाने दहशतवादाचे असे आणखीन किती आघात मुकाट्याने सोसायचे? पाकिस्तानात बसलेल्या या क्रूरकर्मा दहशतवादीहल्ल्याच्या सूत्रधारांचा खात्मा कधी होणार? मृतात्म्यांना शांती कशी मिळणार? यांसारख्या प्रश्नांची घुसमट जनमानसात कायम होती. कारण, तत्कालीन काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारने देशावर एकप्रकारच्या छेडलेल्या या अघोषित युद्धाची पाकिस्तानला कणखर प्रतिक्रिया देण्याचे साधे धाडसही दाखवले नाही.
खरंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याकडे कायमच मनमोहन सिंग सरकारने दुर्लक्ष केले. मुंबईसह देशभरात दहशतवादी हल्ले होत राहिले, तरी देशातील मुस्लिम मतपेढीला न दुखावण्याचीच या सरकारची अघोषित नीती ‘जैसे थे’ होती. उलट या सगळ्या षड्यंत्रातून हिंदू समाज आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला, संघाला बदनाम करण्याचाच डाव काँग्रेसमधील दिग्विजय सिंह, पी. चिदंबरमसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी आखला. त्यांच्या भाकडकथांमधूनच त्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ नावाच्या मिथकाला जन्म दिला. एरवी ‘दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो’ म्हणणाऱ्यांनी हिंदूंना बदनाम करण्याचा कुटील डाव आखला तो असा!
सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा धोरणांतील अपयश, काँग्रेसची लाचारी यावर पडदा टाकण्यासाठीच काँग्रेसने वेळोेवेळी सत्ताशक्ती, अर्थशक्तीच्या बळावर अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन असत्याचे प्रयोग केले. गृहखात्यातील अंतर्गत सुरक्षा विभागाचे माजी सचिव आर.व्ही.एस मणी यांनी ‘द मिथ ऑफ हिंदू टेरर’ या पुस्तकातून ‘हिंदू दहशतवाद’ या काँग्रेसरचित षड्यंत्राचा पर्दाफाशही केला आहे. तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्यावेळी मुंबईतील सैन्याची कुमक न वापरता दिल्लीहून ‘एनएसजी’च्या तुकड्या पाठविण्याचा घेतलेला निर्णय, त्यांच्याबरोबर स्वत: जबाबदारी म्हणून मुंबईत न येता संपर्ककक्षेच्या बाहेर जाणे, अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि पुढचे आदेश न देणे यांसारखे गंभीर प्रकारही मणी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले आहेत..
शिवराज पाटील आणि जोधपुरी सूट
मुंबईमध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला सुरु होता, तेव्हा गृहमंत्री असलेले शिवराज पाटील चाकूरकर कपडे बदलण्यामुळे चर्चेत आले होते. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची आपातकालीन बैठक बोलवण्यात आली होती. इतक्या महत्वाच्या बैठकीला चाकूरकर उशीराने पोहचले होते, कारण ते सूट बदलण्यात व्यस्त होते. दहशतावादी हल्ला झाला त्या दिवशी गृहमंत्रालयाच्या पाच बैठका झाल्या होत्या, या सर्व बैठकामध्ये चाकूरकर वेगवेगळ्या पोशाषात उपस्थित होते. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या सगळ्या गदारोळानंतर त्यांच्याकडून यूपीआय सरकारनं गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता.
इतकेच नाही तर मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील सिलसिलेवार भागातही बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी सगळ्या ठिकाणी एकच हल्लकल्लोळ माजला होता. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण अशा वातावरणातही तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांचं सर्व लक्ष पोशाखावर होतं. यावेळीदेखील दोन तासात त्यांनी तीन वेळा सूट बदलला होता.
तुकाराम ओंबळेंचे हिंदू समाजावर अनंत उपकार
’हिंदू दहशतवाद’ हे कथानक अधिक बलवान करण्यासाठी कसाब हा हिंदू होता हे ठरवणे आवश्यक होते. ‘लेट मी से इट नाऊ’ हे राकेश मारिया यांचे पुस्तक वाचायला हवे. ते मुंबई पोलीस कमिशनर होते. ते लिहितात.. पुढे जे मारिया लिहितात ते शब्दश: असे आहे. जर सर्व सुरळीत झाले असते, तर तो एखाद्या हिंदूप्रमाणे मनगटावर लाल दोरा बांधून मरण पावला असता. आम्हाला त्याच्याजवळ एखादे काल्पनिक नाव असलेले ओळखपत्र सापडले असते: समीर दिनेश चौधरी, अरुणोदय डिग्री अँड पी.जी. कॉलेजचा विद्यार्थी, वेदे्र कॉम्प्लेक्स, दिलखुशनगर, हैदराबाद-५०० ०६०. तसेच 254, टीचर्स कॉलनी, नगरभावी, बंगळुरू येथील रहिवासी.
हिंदू दहशतवाद्यांनी कसा मुंबईवर हल्ला केला, हे कंठशोष करून सांगणारे मथळे वृत्तपत्रांमध्ये झळकले असते. वरच्या वर्तुळातील वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी बंगळुरूमध्ये त्याच्या धाय मोकलून रडणाऱ्या कुटुंबीयाच्या आणि शेजार्यांच्या मुलाखती घेण्यासाठी रीघ लावली असती; पण अरेरे, हे असे घडले नाही आणि तो पाकिस्तानातील फरीदकोटचा अजमल अमीर कसाब म्हणूनच कोर्टात हजार होता. तुकाराम ओंबाळे हुतात्मा झाले पण त्यांनी हिंदू समाजावर बालंट येऊ दिले नाही.
‘श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’
काही वर्षांपूर्वी मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली. पाटील म्हणाले की, मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे.” श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.
शिवराज चाकूरकर किती सच्चे काँग्रेसी होते याची जाणीव आपल्याला वरील विधानातून होते. त्यांना संपूर्ण मानव समाजाला धर्म ज्ञान प्रदान करणाऱ्या गीते मध्ये देखील जिहादच दिसला. राजकारणात धर्मराज बनून चालत नाही. राजकारण हा संन्याशांचा प्रांत नव्हे. रामदास स्वामी संन्यासी असूनही त्यांना याची उत्तम जाण होती. ’उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट’ हा त्यांचा आदेश आहे.
जे कोणतेही नियम पाळत नाहीत, धर्माने वागत नाहीत, नीतीशी त्यांचा काही संबंध नाही अधर्मीशी लढताना रामायण सांगून काही उपयोग नाही. तेथे महाभारतातील कृष्ण लागतो. ज्या कृष्णाचे धर्मीय अधिष्ठान पक्के आहे, रणांगणात कोण उभे आहे, हे ज्याला माहीत आहे, त्यांच्या अधर्मी जीवनचरित्राची त्याला माहिती आहे.म्हणून तो अर्जुनाला सांगू शकला की, अर्जुना, धनुष्यबाण उचल आणि शरसंधान कर. हे शरसंधान नरेंद्र मोदी करत आहेत. क्षमाशील असण्याचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. कर्मफळातून कोणाचीच सुटका नाही. शस्त्रे तेव्हाच मारक ठरतात जेव्हा ती योग्य वेळी बाहेर काढली जातात आणि योग्य लक्ष्यावर सोडली जातात. वेळ आणि लक्ष्य चुकले तर शस्त्र निरुपयोगी होते हे देखील आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
