परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

तांत्रिक कारणामुळे मोनो रेल्वेही बंद

परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसाने सोमवारी पहाटेही आपला जोर कायम ठेवत नागरिकांची तारांबळ उडवली आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावर निघालेल्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेमार्गावरील आणि हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. दादर, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदमाता चौक येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. महानगरपालिकेच्या मशिनरीच्या मदतीने पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर अंधेरी सबवे (अंधेरी पश्चिम) येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली असून वाहतूक गोखले ब्रीज मार्गे वळविण्यात आली आहे.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा:

लहान-सहान गोष्टी विसरायला लागला आहात?

आता देशात एक डेमोग्राफी मिशन

राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार

आर.जी. कर मेडिकल प्रकरण : आरोपी मंगेतर मालदात अटक

मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला असतानाच आता तांत्रिक कारणामुळे मोनो रेल्वेही बंद पडली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मोनो रेल विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. वडाळा भागात मोनो रेल मध्येच बंद पडली. त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं. फायर ब्रिगेडच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या मोनोरेल मधून बाहेर काढल. ही मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना मध्येच बंद पडली. ऐन सकाळच्यावेळी वडाळा भागात मोनोरेल बंद पडल्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे यामुळे हाल झाले.

Exit mobile version