आयसीसीने टीम इंडियावर दंड ठोठावला

आयसीसीने टीम इंडियावर दंड ठोठावला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका २–१ ने जिंकल्यानंतर भारतीय संघावर आयसीसीने दंड लावला आहे. रायपूर येथे ३ डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात धीम्या ओव्हर-रेटमुळे टीम इंडियावर मॅच फीच्या १० टक्के दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“खेळाडू आणि प्लेयर सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.२२ नुसार, निर्धारित वेळेत प्रत्येक ओव्हर कमी टाकल्यास प्रत्येक ओव्हरमागे मॅच फीच्या ५ टक्के दंडाची तरतूद आहे.”

के. एल. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टाइम अलाउन्स गृहित धरून लक्ष्यापेक्षा २ ओव्हर कमी टाकले. त्यानंतर आयसीसी एलिट पॅनेलचे सदस्य रिची रिचर्डसन यांनी हा दंड ठोठावला. के. एल. राहुल यांनी चूक मान्य करत प्रस्तावित शिक्षेला सहमती दर्शवली, त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज पडली नाही.

रायपूरमध्ये झालेला दुसरा वनडे दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्सने जिंकत मालिका १–१ अशी बराबरीत आणली होती. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावून ३५८ धावा केल्या.

या सामन्यात विराट कोहली यांनी ९३ चेंडूत षटकार आणि चौकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या, तर ऋतुराज गायकवाड यांनी ८३ चेंडूत १०५ धावा ठोकल्या.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर एडेन मार्करम (११०) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला. याशिवाय मॅथ्यू ब्रीत्जके (६८) आणि देवाल्ड ब्रेविस (५४) यांनी अर्धशतके झळकावली.

मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरला. टीम इंडियाने अंतिम सामना ९ विकेट्सने जिंकत मालिका आपल्या नावावर केली.

भारताने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट मालिका ०–२ ने गमावली होती. त्यानंतर वनडे मालिकेत भक्कम पुनरागमन करत प्रत्युत्तर दिले. आता टीम इंडियाचे लक्ष्य ५ सामन्यांच्या टी२० मालिकेवर असेल.

Exit mobile version