आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) कार्यरत असलेल्या राकेश शर्मांकडे बँकींग क्षेत्रातील अनुभवाचे भलेमोठे गाठोडे आहे. ४० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या प्रवासाची सुरूवात भारतीय स्टेट बँकेतून झालेली आहे.
मी त्यांना कामानिमित्त काही वेळा भेटलो आहे. कधी कधी कार्यक्रमातही भेट झालेली आहे. ते मोजके बोलतात. जे काही बोलतात ते पूर्णपणे कामाशी संबंधित असते. शंभरटक्के व्यावसायिक वागणे, परंतु त्यात कधीही ताठरपणा जाणनत नाही. कमालीची सौम्यता, समोरच्याला आश्वस्त करणारे खास रसायन त्यांच्याकडे आहे. ज्यामुळे एकदा भेटलेल्या माणसाला पुन्हा भेटावेसे वाटते. त्यांचा मॅग्नेट खूप सशक्त आहे. मला तरी प्रत्येक भेटीत तो जाणवला आहे.
एसबीआयमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर, त्यांनी सुरक्षित करीयरला राम राम ठोकला. काही तरी नवी प्रयोग करण्याच्या उर्मीपोटी त्यांनी लक्ष्मी विलास बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी स्वीकारली. इथून प्रयोगांची मालिका सुरू झाली. एका ठिकाणी जायचे, गढी भक्कम करायची आणि पुढे सरायचे. जवळपास दीड वर्ष लक्ष्मी विलास बँकेत काम केल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये कॅनरा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. तिथे तीन वर्षांचा कार्यकाळ जुलै २०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आणखी एक मोठी उडी घेतली. एव्हाना त्यांना ‘लांब उडी’ची सवय झाली होती. त्यांची प्रत्येक ‘उडी’ अर्थात निर्णय यशस्वी होता.
हे ही वाचा:
लाखो विद्यार्थी जोडले गेले इन्स्पायर मानक योजनेला!
तुमचं प्रेम माझी सर्वात मोठी ताकद आहे
मेलबर्नमध्ये सौरभ आनंद यांच्यावर तलवारीने हल्ला
खराडीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सापडले रेव्ह पार्टीत
ऑक्टोबर २०१८ पासून आयडीबीआय बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाची धुरा त्यांच्याकडे आली. हे मोठे आव्हान होते. बँकेला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि तिच्या प्रगतीसाठी शर्मा यांचे प्रयत्न सुरू झाले. अनुभवाचा उपयोग करून बँकेला अधिक सक्षम बनवण्यासाठी त्यांनी उपाययोजना सुरू केल्या. ग्राहक सेवा अधिक सहज, सोप्या, सुटसुटीत करण्यावर त्यांनी भर दिला. ‘तंत्रज्ञानाचा वापर करताना ते ग्राहकाला सुद्धा सहज वापरता यायला हवे’, हा दृष्टीकोन त्यांनी टेक्निकल टीमला दिला. बँकेला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे काम त्यांनी सुरू केले.
जुलै २०१८ मध्ये राकेश शर्मा यांनी आयडीबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला १९ मार्च २०२५ रोजी रिझर्व बँकेने त्यांची त्याच पदावर तीन वर्षांसाठी फेरनियुक्ती केली. राकेश शर्मा सध्या ६७ वर्षांचे आहेत त्यांच्यावर केंद्र सरकारने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यांचा आयडीबीआय मधला कार्यकाळ दहा वर्षाच्या पुढे जाणार ही बाब निश्चित आहे. एवढा प्रदीर्घ काळ त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं आयडीबीआयला मोठं केलं असं आपण ठामपणे म्हणू शकतो.
शर्मा यांची ओळख एक बँकर म्हणून आहे. परंतु त्यांना ओळखणाऱ्यांना ठाऊक आहे की, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक छोटासा पैलू आहे. कृषी आधारीत ग्रामीण अर्थव्यवस्था, वित्त, लघु उद्योग, प्रशासन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स अशा विविध विषयांमध्ये त्यांना रस आहे. त्यांचा या क्षेत्राचा अभ्यासही आहे. या सगळ्या विषयांबाबत त्यांचे नियमित वाचन सुरू असते. जगभरात या क्षेत्रांमध्ये काय घडते आहे, यावर त्यांचे बारीक लक्ष असते.
आयडीबीआयमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी जे काही प्रयत्न केले त्याचे दृष्य परीणाम आता दिसू लागले आहेत. तंत्रज्ञानावर भर देण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाचा बँकेला फायदा होतो आहे. ग्राहकांना आधुनिक आणि प्रभावी सेवा देणे शक्य होते आहे. संपूर्ण कारकिर्दीत, पारदर्शकता, नैतिक मूल्ये आणि मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्सला त्यांनी प्राधान्य दिले आहे. आयडीबीआय बँकेच्या उत्तुंग भवितव्याबाबत ते फक्त आशावादीच नाहीत, तर त्यांना भक्कम आत्मविश्वासही आहे. आता तर कुठे त्यांनी सुरूवात केलेली आहे. माझ्यासारख्या शुभचिंतकांच्या त्यांना शुभेच्छाही आहेत. अभी तो लांघा है समंदर उसने, अभी पुरा आसमान बाकी है.
