दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज, हरमनप्रीतची पुनरागमनाची शक्यता

भारत-इंग्लंड महिला टी२० :

दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज, हरमनप्रीतची पुनरागमनाची शक्यता

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवार, २ जुलै रोजी ब्रिस्टल येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात तब्बल ९७ धावांनी विजय मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास सध्या उंचावलेला आहे. या सामन्यात भारताने २१० धावा केल्या होत्या, तर इंग्लंडचा संघ १४.५ षटकांत ११३ धावांवर गारद झाला होता.

भारताकडून स्मृती मंधानाने ११२ धावांची शतकी खेळी करत सामना आपल्या बाजूला झुकवला होता. आता दुसऱ्या सामन्यातही भारत आपला विजयी मोर्चा कायम ठेवण्याच्या तयारीत आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे सहभागी होऊ शकली नव्हती. मात्र दुसऱ्या सामन्यात तिच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात असून, ती मैदानात उतरल्यास भारताला मोठं बळ मिळू शकतं.

हरमनप्रीत, स्मृती मंधाना आणि हरलीन देओल यांच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्याच टी२० सामन्यात १२ धावा देत ४ बळी मिळवणाऱ्या श्री चरणी कडूनही प्रभावी कामगिरीची आशा आहे. याशिवाय, राधा यादव आणि दीप्ती शर्मा यांच्याकडूनही गोलंदाजी विभागात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ही मालिका २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी२० विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिली जात आहे. भारताचा फिरकी आक्रमण पहिल्या सामन्यात इंग्लंडवर भारी ठरला होता, आणि त्याचाच फायदा भारत पुढील लढतीतही घेण्याचा प्रयत्न करेल.

दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता सुरू होईल. टॉस रात्री १०.३० वाजता होणार आहे. चाहत्यांना हा सामना ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर थेट पाहता येईल, तर ‘सोनी लिव’ अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असेल.


🔹 भारतीय महिला संघ:

शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरलीन देओल, ऋचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया, सायाली सतघरे, क्रांती गौड.

🔹 इंग्लंड महिला संघ:

सोफिया डंकले, डॅनिएल वॅट-हॉज, नैट साइवर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (यष्टीरक्षक), एलिस कॅप्सी, एम. अर्लट, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल, चार्लोट डीन, इस्सी वोंग, पेज स्कोल्फील्ड.

Exit mobile version