रोहित–कोहली विश्वचषक जिंकतील!

रोहित–कोहली विश्वचषक जिंकतील!

भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा आणि चेस मास्टर विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर दोघांनीही देशांतर्गत विजय हजारे स्पर्धेत आपली चमक कायम राखली आहे. रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, रोहित आणि कोहली केवळ २०२७ चा विश्वचषक खेळणारच नाहीत, तर तो भारतीयांना जिंकूनही दाखवतील.

दिनेश लाड म्हणाले, “रोहित शर्मा आणि विराट कोहली ज्या पद्धतीने सध्या खेळत आहेत, ते पाहता मला शंभर टक्के विश्वास आहे की हे दोघे २०२७ चा विश्वचषक खेळतील आणि ट्रॉफी त्यांच्या हातातच असेल. याची मी शंभर टक्के हमी देतो.”

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी व टी-२० या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असून, सध्या ते केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसत आहेत.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितला अवघ्या ८ धावा करता आल्या. मात्र त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ७३ आणि १२१* धावांची शानदार खेळी साकारली. पुढे नोव्हेंबर–डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेत रोहितने ५७, १४ आणि ७५ धावा करत भारताला ३ सामन्यांची मालिका २–१ अशी जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

३८ वर्षीय रोहितची हीच फॉर्मची लय विजय हजारे ट्रॉफीतही कायम राहिली. २४ डिसेंबर रोजी मुंबईकडून खेळताना त्याने सिक्कीमविरुद्ध ९४ चेंडूंमध्ये ९ षटकार आणि १८ चौकारांसह १५५ धावांची जबरदस्त खेळी करत मुंबईला ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवून दिला.

दुसरीकडे, ३७ वर्षीय विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांत खातेही उघडले नव्हते. मात्र अखेरच्या सामन्यात त्याने नाबाद ७४ धावा करत रोहित शर्मासोबत १६८ धावांची अटूट भागीदारी रचली आणि भारताला ९ गडी राखून विजय मिळवून दिला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीने पहिल्या सामन्यात १३५ धावांची खेळी केली, त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही १०२ धावांचे शतक झळकावले. निर्णायक सामन्यात त्याने नाबाद ६५ धावा करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

देशांतर्गत क्रिकेटमध्येही कोहलीचा फॉर्म तितकाच प्रभावी राहिला आहे. २४ डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून आंध्राविरुद्ध त्याने १३१ धावा केल्या, तर २६ डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध अवघ्या ६१ चेंडूंमध्ये ७७ धावांची उपयुक्त खेळी साकारली.

Exit mobile version