कांगारूंवर धडकणार रन मशीन

कांगारूंवर धडकणार रन मशीन

टीम इंडियाचा ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पुन्हा सरावाला परतला आहे. लंडनमध्ये गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईम अमीन यांच्या उपस्थितीत कोहलीने नेट्समध्ये फलंदाजीची धार वाढवली.

कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, “हिटमध्ये मदत केल्याबद्दल धन्यवाद, भाऊ. तुला पाहून नेहमी छान वाटतं.” त्याचबरोबर सराव सत्रातील अमीनसोबतचा फोटोही शेअर केला.

अमीन यांनीही ती स्टोरी री-शेअर करत लिहिले, “भाऊ, तुला भेटून छान वाटलं! लवकरच भेटू.” अमीन बर्कशायर, बकिंघमशायर आणि लंडनमध्ये ‘मायटी विलो’ क्रिकेट अकादमी चालवतात. यापूर्वी ते आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या प्रशिक्षक पथकात होते.

हार्दिक पांड्याही याआधी अमीन यांच्या अकादमीमध्ये सरावासाठी गेले होते.

टेस्ट आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कोहलीचं लक्ष आता पूर्णपणे भारतासाठी वनडे क्रिकेट आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)साठी खेळण्यावर आहे.

कोहलीने आतापर्यंत ३०२ वनडे सामन्यांत १४,१८१ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात त्याने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून आरसीबीला पहिला आयपीएल किताब मिळवून दिला होता. त्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला होता.

कोहलीला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, त्यासाठी त्यांना ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. भारताचा बांग्लादेश दौरा परस्पर सहमतीने सप्टेंबर २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

कोहली आणि रोहित शर्मा यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वनडे मालिकेत पुनरागमनाची अपेक्षा आहे. हा दौरा १९ ऑक्टोबरला पर्थ स्टेडियमवर सुरू होईल. पुढील सामने २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी खेळले जातील.

Exit mobile version