गेल्या आठवडाभरापासून भारताच्या अनेक भागांत, विशेषतः उत्तर राज्यांत, मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या आकडेवारीनुसार, २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा तब्बल ४८% जास्त पाऊस झाला.
या कालावधीत भारतात ७५.२ मिमी पाऊस झाला, जेथे सरासरी प्रमाण ४९ मिमी आहे. म्हणजे ४८% अधिक पावसाची नोंद झाली.
याशिवाय, १ जून ते ३ सप्टेंबर दरम्यान भारतात एकूण ७८०.८ मिमी पावसाची नोंद झाली, जे हंगामाच्या सरासरी ७२१.१ मिमीच्या तुलनेत ८% अधिक आहे.
देशातील वाढलेला पाऊस हा मॉन्सून ट्रफ नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकल्यामुळे आणि खालच्या स्तरापर्यंत विस्तारल्यामुळे झाल्याचे IMD ने सांगितले आहे. हे सक्रिय मान्सून परिस्थितीचे लक्षण मानले जाते.
सामान्यतः ही ट्रफ ईशान्य अरबी समुद्रापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत जाते.
हे ही वाचा:
“युक्रेनमध्ये निष्पापांचा मृत्यू अस्वीकार्य, संघर्षाचा अंत सर्वांच्या हिताचा”
एनआयआरएफ रँकिंग : आयआयटी मद्रास नंबर वन
खदखदणारा युरोप भारतासोबत येतोय?
उत्तर भारतात हाहा:कार
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरियाणामध्ये अखंड पावसामुळे या हंगामात ३०० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो गावे जलमग्न झाली असून प्रमुख महामार्ग बंद झाले आहेत.
पावसामुळे हजारो कोटी रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले असून, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. गेल्या अनेक दशकांतील ही सर्वात भीषण हवामान आपत्ती मानली जाते.
पंजाबमधील भीषण स्थिती
गेल्या अनेक दशकांतील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत असलेल्या पंजाबमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १.७१ लाख हेक्टर जमीन पाण्याखाली जाऊन पिके नष्ट झाली आहेत.
मंत्री हरदीप सिंग मुंडियन यांनी सांगितले की, २३ जिल्ह्यांतील १,९०२ गावे बाधित झाली असून ३.८४ लाखांहून अधिक रहिवासी प्रभावित झाले आहेत.
पुढील अंदाज
IMD ने पुढील तीन दिवसांत उत्तर भारतात अजून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू राहील. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये १० सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा आहे. पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये ७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
