कोकाटेंना न्यायालयाचा दणका; अटकेचा धोका

कोकाटेंना न्यायालयाचा दणका; अटकेचा धोका

कोकाटेंना न्यायालयाचा दणका! २ वर्षांचा कारावास कायम, मंत्रिपदावर संकट

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावलेली २ वर्षे कारावास व १० हजार रुपयांचा दंड ही शिक्षा जैसे थे ठेवण्यात आली असून, त्यामुळे कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे.

शासकीय कोट्यातील १० टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दिलेल्या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पी. एम. बदर यांनी निकाल जाहीर करत खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हा निकाल कोकाटेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे प्रकरण सुमारे ३० वर्षांपूर्वीचे आहे. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘न्यू व्ह्यू अपार्टमेंट’ येथे अल्प उत्पन्न गटाच्या (LIG) सदनिकांचा गैरवापर केल्याचा आरोप कोकाटेंवर आहे. मुख्यमंत्री कोट्यातून चार जणांना सदनिका मिळवून दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली होती. याबाबत तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती. चौकशीनंतर प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला शिक्षा सुनावली होती.

या निकालामुळे मंत्रिपदही धोक्यात आले असून, पुढील दिलासासाठी कोकाटेंना आता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. दरम्यान, विरोधकांनी पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
आता अटक होणार का? आणि पुढची कायदेशीर दिशा काय असेल—याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version