मराठा आंदोलकांनी मुंबईला वेठीस धरले, कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल!

मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.

मराठा आंदोलकांनी मुंबईला वेठीस धरले, कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल!

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे शुक्रवारी मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यामुळे रस्त्यांवर आणि रेल्वे स्थानकांवर अभूतपूर्व गर्दी झाली, ज्यामुळे मुंबईत कामावर येणाऱ्याच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला.

मुंबईची लाईफलाईन ‘लोकल’ तुडुंब….

मराठा आंदोलकांचे जथ्येच्या जथ्ये मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनने सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचत होते. यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. कसारा, कर्जत, पालघर, विरार, आणि नवीमुंबईतुन येणाऱ्या लोकल गाड्या आंदोलकांनी तुडुंब भरल्या होत्या. अनेक चाकरमान्यांना गर्दीमुळे रेल्वे स्थानकातूनच परतावे लागले, तर हातावर पोट असणाऱ्यांना मात्र कसरत करत कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागले.

दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी……

आंदोलकांनी संपूर्ण दक्षिण मुंबई व्यापल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. मिळेल त्या वाहनांनी मुंबईकडे कूच केलेल्या आंदोलकांमुळे रस्त्यांवर प्रचंड गर्दी झाली. याचा परिणाम म्हणून सीएसएमटी तसेच आसपासच्या भागांत कार्यालय गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले.

चाकरमान्यांच्या कामावर परिणाम
कल्याण, कसारा, कर्जत, बदलापूर, डोंबिवली, ठाणे नवी मुंबई अशा अनेक भागांतून मुंबईत कामासाठी येणारे कर्मचारी आणि व्यापारी यांना आंदोलनाचा मोठा फटका बसला. बदलापूरहून सकाळी ७ वाजता निघालेले निरंजन औटी यांना सीएसएमटीला पोहोचायला एक तास उशीर झाला. ते म्हणाले, “नेहमीप्रमाणे मी ७ वाजता निघालो, पण लोकल ट्रेन आंदोलकांनी पूर्ण भरल्या होत्या. फर्स्ट क्लासच्या डब्यातही प्रचंड गर्दी होती. सीएसएमटीला उतरल्यावर स्टेशन आणि परिसर दोन्ही ठिकाणी आंदोलकांची गर्दी असल्यामुळे मला चालत कार्यालयात जावं लागलं.”

हे ही वाचा : 

हॉकी आशिया कप: भारताचा चीनवर ४–३ ने रोमांचक विजय!

मराठा आंदोलनामुळे फ्री वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये कोंडी

भारत-जपान भागीदारीचा “सुवर्ण अध्याय”; मोदी-इशिबा यांच्यात १० वर्षांचा सहकार्य करार

चिंता कशाला भारत आहे ना ! अमेरिकेच्या बसमधून उतरण्याचे जपानचे संकेत…

रामराव फुटाणे, जे दररोज सकाळी ९:३० वाजता कार्यालयात पोहोचतात, त्यांना गर्दीमुळे सीएसएमटीला पोहोचायला अकरा वाजले. ते म्हणाले, “गर्दीमुळे अनेक गाड्या सोडाव्या लागल्या. आता कार्यालयात पोहोचतोय, बहुधा आज अर्धा दिवसच काम करावं लागेल.” गणेश चतुर्थीच्या सुट्टीनंतर कामावर परतलेल्या अनेकांना या गर्दीमुळे कामावर पोहोचण्यास उशीर झाला, तर काहींना ‘लेटमार्क’ लागला किंवा ‘खाडा’ (गैरहजेरी) करावा लागला.
हे आंदोलन मुंबईकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरले असून, जनजीवनावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे.

Exit mobile version