उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रविवारी तेलंगणातील कान्हा शांती वनम येथे आयोजित ‘विश्व ध्यान दिना’च्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी मनःशांती, भावनिक कल्याण आणि सामाजिक सलोखा वाढविण्यात ध्यानाची शाश्वत उपयुक्तता अधोरेखित केली. सभेला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, ध्यान ही एक सार्वत्रिक पद्धत आहे, जी सांस्कृतिक, भौगोलिक आणि धार्मिक सीमांपलीकडे जाते. त्यांनी ध्यानाला मानसिक स्पष्टता, भावनिक स्थैर्य आणि अंतर्गत परिवर्तनाचा मार्ग असे संबोधले आणि ‘विश्व ध्यान दिन’ हा आधुनिक जीवनात चिंतनाच्या वाढत्या महत्त्वाची जाणीव करून देणारा प्रसंग असल्याचे नमूद केले.
उपराष्ट्रपतींनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या त्या ठरावाचा उल्लेख केला, ज्याच्या सहप्रायोजकत्वात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आणि २१ डिसेंबर हा ‘विश्व ध्यान दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. ते म्हणाले की, ‘विश्व ध्यान दिना’मुळे मानसिक आरोग्य आणि आध्यात्मिक विकासासाठी ध्यानाच्या शक्तीला जागतिक मान्यता मिळाली आहे. यावेळी त्यांनी ‘दाजी’ यांच्या ध्यानाच्या प्रसारातील योगदानाचे कौतुक केले. तसेच, ध्यान, योग आणि आध्यात्मिक शोधाच्या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेसह भारत आजही जगाला शाश्वत ज्ञान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा..
बांगलादेशातील तणाव : अमेरिकन दूतावासाकडून अलर्ट
राष्ट्रपतींकडून ‘जी राम जी विधेयक’ला मंजुरी
आता भाजपा शहरात आणि ग्रामीण भागातही नंबर वन
परदेशी मिशनच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध
भारताच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत राधाकृष्णन म्हणाले की, आपल्या देशात ध्यानाला मन आणि आत्म्याचे एक प्राचीन विज्ञान मानले गेले आहे, ज्याचा प्रसार ऋषी-मुनींनी केला. भगवद्गीता आणि तमिळ भाषेतील महान ग्रंथ ‘तिरुमंथिरम’ यांच्या शिकवणीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, ध्यानाच्या माध्यमातून मनावर नियंत्रण मिळवल्यासच माणसाला आंतरिक शांती प्राप्त होते, स्वतःची योग्य ओळख होते आणि तो उत्तम जीवन जगू शकतो. उपराष्ट्रपतींनी ठामपणे सांगितले की, ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयपूर्तीत ध्यानाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीही तितकीच आवश्यक आहे. ध्यानाच्या माध्यमातून आपण असा समाज घडवू शकतो, जिथे शांती नांदेल, लोकांमध्ये संकटांचा सामना करण्याची ताकद असेल आणि परस्परांबद्दल सद्भाव राहील.
‘मिशन लाईफ’ या संकल्पनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ध्यानामुळे जागरूकता, जबाबदारी आणि निसर्गाशी सुसंवाद यांसारखे गुण विकसित होतात, जे शाश्वत जीवनशैलीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कान्हा शांती वनमच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. नागरिकांना ध्यान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन करत, राधाकृष्णन यांनी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाने स्वतः उदाहरण घालून द्यावे, असे सांगितले. तसेच, मानसिक शांती, संतुलन आणि सलोखा वाढविणाऱ्या पद्धती स्वीकारण्यासाठी भावी पिढीलाही प्रेरित करावे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, तेलंगणा सरकारचे मंत्री डी. श्रीधर बाबू, हार्टफुलनेस मेडिटेशनचे आध्यात्मिक मार्गदर्शक दाजी कमलेश डी. पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कान्हा शांती वनम येथे आयोजित सामूहिक ध्यान सत्रात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.
