ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सध्या आपल्या १००व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ५ बळी घेत, ६/९ अशी अफलातून कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना फक्त २७ धावांत गुंडाळलं. हा स्कोअर कसोटी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी धावसंख्या आहे.
पण या विक्रमी प्रदर्शनाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोंटिंगला आठवला २०१२ सालचा भारत दौरा – आणि विशेषतः पर्थ टेस्टमधील तो अविस्मरणीय स्पेल जिथे सचिन तेंडुलकरलाही मिचेल स्टार्कने दबावाखाली आणलं होतं!
पोंटिंग म्हणतो, “ती दुसरी इनिंग होती… स्टार्कचा केवळ तिसरा कसोटी सामना. पण त्याने सचिनच्या खांद्याभोवती टाकलेल्या त्या धारदार शॉर्ट बॉल्स… सचिनसारखा दिग्गजही अस्वस्थ झाला होता. तेव्हा आम्हाला समजलं – हाच मुलगा भविष्यात काहीतरी भन्नाट करणार!“
पिंक बॉलने झालेल्या जमैकामधील कसोटीत स्टार्कने ४०० कसोटी विकेट्सचा टप्पा पार करत आपल्या करिअरला सुवर्णाक्षरांनी सजवलं. त्याच्या नावावर आता २ वनडे वर्ल्ड कप, १ टी२० वर्ल्ड कप, आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता ठरण्याचा मान आहे.
पोंटिंगने स्टार्कच्या नव्या डिलिव्हरी स्टाइल्सबद्दल सांगितलं – “त्याने थ्री-क्वार्टर सीम, वोबल सीम यांसारख्या नवनवीन डिलिव्हरी प्रकार आत्मसात केलेत, जे त्याच्या इन-स्विंगला अधिक घातक बनवत आहेत.“
शेवटी पोंटिंग म्हणतो – “सर्व वेगवान गोलंदाजांप्रमाणे त्यालाही दुखापतींचा सामना करावा लागला, पण त्या झेलून त्याने जो ४०० विकेट्सचा डोंगर सर केला – तो खरोखर वंदनीय आहे!“
