“हजारो मैल दूर असला तरी, आमच्या हृदयाच्या जवळ आहात”

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या सुनीता विल्यम्स यांच्याविषयीच्या भारतीयांच्या भावना

“हजारो मैल दूर असला तरी, आमच्या हृदयाच्या जवळ आहात”

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकून पडले होते. नऊ महिन्यांपासून अडकून पडलेल्या या दोन अंतराळवीरांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून आता मंगळवारी संध्याकाळी ५:५७ वाजता (अमेरिकन वेळेनुसार) फ्लोरिडाच्या समुद्रात त्यांना घेऊन येणारे यान उतरेल. भारतीय वेळेनुसार, ते बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास पोहचतील.

संपूर्ण जग या दोन अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीची वाट पाहत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्स यांना भावनिक पत्र लिहून देशातील १.४ अब्ज लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, तुम्ही आमच्यापासून हजारो मैल दूर असलात तरी आमच्या हृदयाच्या जवळ आहात. हे पत्र सुनीता यांना अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांच्यामार्फत पोहोचवण्यात आले आहे. ज्यांना पंतप्रधान मोदी हे अलीकडेच एका कार्यक्रमात भेटले होते.

नरेंद्र मोदी यांनी पत्रात काय लिहिले आहे?

नरेंद्र मोदी यांनी पत्रात लिहिले आहे की, “मी तुम्हाला भारतीय जनतेकडून शुभेच्छा देतो. एका कार्यक्रमात मी प्रसिद्ध अंतराळवीर माइक मॅसिमिनो यांना भेटलो. आमच्या संभाषणादरम्यान, तुमचे नाव आले आणि आम्ही तुमच्या आणि तुमच्या कार्याचा आम्हाला किती अभिमान आहे यावर चर्चा केली. या संवादानंतर, मी तुम्हाला पत्रातून या भावना पोहचवण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. अमेरिकेच्या माझ्या भेटीदरम्यान जेव्हा मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटलो तेव्हा मी तुमच्या तब्येतीची विचारपूस केली. १.४ अब्ज भारतीयांना तुमच्या कामगिरीचा नेहमीच अभिमान आहे. अलिकडच्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा तुमचे प्रेरणादायी धैर्य आणि चिकाटी दिसून आले आहे. तुम्ही हजारो मैल दूर असला तरी, तुम्ही आमच्या हृदयाच्या जवळ आहात. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि तुमच्या मोहिमेत यश मिळावे यासाठी प्रार्थना करत आहेत. श्रीमती बोनी पंड्या तुमच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत असतील आणि मला खात्री आहे की स्वर्गीय दीपकभाईंचे आशीर्वाद तुमच्यासोबत असतील. २०१६ मध्ये माझ्या अमेरिका भेटीदरम्यान त्यांना तुमच्यासोबत भेटल्याचे मला आठवते. तुम्ही परतल्यानंतर, तुम्हाला भारतात पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारताला त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित कन्येपैकी एकीचे आदरातिथ्य करणे आनंददायी असेल. तुम्हाला आणि बुच विल्मोर यांना सुरक्षित परत येण्यासाठी शुभेच्छा.”

हे ही वाचा : 

नागपूर हिंसाचार: दंगेखोरांना आठवणार पाकिस्तानी अब्बा !

फीफा विश्वचषक पात्रता फेऱ्यांसाठी मेस्सीला विश्रांती

बोटाच्या शस्त्रक्रियेनंतर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात

बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईसाठी संशयास्पद वस्त्यांमध्ये कॉम्बिग ऑपरेशन करा

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल नऊ महिने अंतराळस्थानकात अडकून पडले. या दोघांनाही परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत होती. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या जागी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात चार अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना होती. क्रू-10 मध्ये चार सदस्यांचा समावेश आहे. यातील अंतराळवीर हे दोन अमेरिकन अंतराळवीर, एक जपान आणि एक रशियाचे आहेत. अखेर हे अंतराळवीरांचे पथक अंतराळ स्थानकात पोहचले आणि सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला.

Exit mobile version