अखेर राहुल गांधी न्यायालयासमोर शरण; मिळाला जामीन!

२० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला

अखेर राहुल गांधी न्यायालयासमोर शरण; मिळाला जामीन!

भारतीय सैनिकांविरुद्ध कथित अपमानास्पद टिप्पणी प्रकरणात लखनौच्या खासदार-आमदार न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने २०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या विधानावरून दाखल झालेल्या या प्रकरणात राहुल गांधी पहिल्या पाच सुनावणीत हजर राहिले नव्हते. अखेर आज (१५ जुलै ) त्यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांच्यासमोर वैयक्तिकरित्या हजर राहून आत्मसमर्पण केले आणि जामीन अर्ज दाखल केला.

राहुल गांधी यांचे वकील प्रांशू अग्रवाल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात खासदार-आमदार न्यायालयाचे न्यायाधीश आलोक वर्मा यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांचा जामीन अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांची सुटका केली. न्यायालयाच्या सूचनेनुसार, जामीनपत्र आणि जामिनाची रक्कम जमा केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. न्यायालय आता पुढील सुनावणीत या प्रकरणात पुढील कारवाई करेल. या मानहानीच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना आरोपी म्हणून समन्स बजावले होते.

प्रकरण काय?
सीमा रस्ते संघटनेचे निवृत्त संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी न्यायालयात राहुल गांधींविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटले होते की, १६ डिसेंबर २०२२ रोजी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याचा अपमान केला होता. ९ डिसेंबर २०२२ रोजी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यात झालेल्या झटापटीचा उल्लेख करताना त्यांनी माध्यमांना आणि लोकांना संबोधित केले होते की, लोक भारत जोडो यात्रेबद्दल विचारतील पण चिनी सैनिकांनी आपल्या सैनिकांना केलेल्या मारहाणीबद्दल एकदाही विचारणार नाहीत.

त्यावेळी भारतीय सैन्याने १२ डिसेंबर रोजी अधिकृत निवेदन जारी केले होते की, चिनी सैन्य भारतीय सीमेवर अतिक्रमण करत आहे, ज्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिले. त्यामुळे चिनी सैन्य आपल्या हद्दीत परत गेले. या संघर्षात दोन्ही बाजूंना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणी तक्रारदाराने आरोप केला की चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांना मारहाण केल्याच्या राहुल गांधींच्या विधानामुळे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

हे ही वाचा : 

दोडामार्गच्या गुणवत्तावान अनुजाची IIT दिल्लीमध्ये भरारी

‘विवादित वास्तूवर नरसिंह राव यांची भूमिका अस्पष्ट होती’

अवकाशातून आला भारताचा ‘तारा’

मुंबईत संधू पॅलेसमध्ये संशयित व्यक्तीचा प्रवेश

राहुल गांधी या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले पण त्यांना तेथे कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर राहुल गांधी आज लखनौ न्यायालयात हजर झाले. राहुल गांधी गेल्या पाच तारखांपासून लखनौ एमपी एमएलए कोर्टात हजर नव्हते. न्यायालयाने त्यांना आज शेवटची संधी दिली, त्यानंतर राहुल न्यायालयात हजर झाले आणि त्यांना जामीन मिळाला.

Exit mobile version