भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं लीड्समधील पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध अप्रतिम कामगिरी करत पाच बळी घेतले. या प्रदर्शनावर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि कोच प्रवीण आमरे यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
प्रवीण आमरे म्हणाले, “बुमराह हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्याकडे विकेट घेण्याची भूक आहे आणि त्याला माहीत आहे की ती कशी काढायची. त्याचं टीम इंडियामध्ये असणं म्हणजे आमच्यासाठी मोठी संपत्ती आहे.”
ते पुढे म्हणाले, “सचिन तेंडुलकरवर जसं बॅटिंगची जबाबदारी होती, तशीच आज बुमराहवर बॉलिंगची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की तो संपूर्ण मालिकेत फिट राहील.”
युवा खेळाडूंच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. “या मालिकेत अनेक नवखे खेळाडू खेळत आहेत. त्यांच्या खांद्यावर दबाव होता, पण त्यांनी जबरदस्त खेळ करून दाखवला. पहिल्याच डावात तीन शतके आणि बुमराहचे पाच बळी मिळाले. सहा धावांची लीड महत्त्वाची आहे,” असं आमरे म्हणाले.
“गिल, पंत, केएल राहुल यांची खेळी लक्षवेधी होती. इंग्लंडमध्ये ओपनिंग फार महत्त्वाची असते आणि राहुलने ती जबाबदारी उत्तमपणे निभावली,” असंही त्यांनी नमूद केलं.
शतकवीर यशस्वी जायसवालवर विश्वास
“हो, रोहित-कोहलीला मिस करतोय, पण यशस्वीसारखे नवोदित खेळाडू जबरदस्त खेळत आहेत. त्याच्याकडून अजून दोन शतके आम्हाला अपेक्षित आहेत,” असं आमरे म्हणाले.
फिल्डिंगवर चिंता व्यक्त
प्रवीण आमरे यांनी भारतीय संघाच्या फिल्डिंगवर चिंता व्यक्त करत सांगितलं की, “टेस्टच्या पहिल्या तीन दिवसांत आपण खूप कैच टाकले. गेल्या पाच वर्षात जेवढे कैच गळाले नव्हते, ते एका डावात झाले. हे सुधारलं, तर आपण इंग्लंडवर वर्चस्व मिळवू शकतो.”
