ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, नामवंत विचारवंत आणि निसर्गप्रेमी अशी ओळख असलेले डॉ. माधव गाडगीळ यांचे ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता निधन झाले. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण, जैवविविधता आणि परिसंस्था संवर्धनासाठी आयुष्यभर झटणारा एक आवाज, अभ्यासू मार्गदर्शक गमावल्याचे बोलले जात आहे. डॉ. माधव गाडगीळ हे भारतातील पर्यावरणशास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर नाव होते.
डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटातील जैवविविधता, निसर्गसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागावर आधारित विकासाचा सातत्याने आग्रह धरला होता. पर्यावरण संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल साधण्याची भूमिका त्यांनी कायम मांडली. जंगल, नद्या, डोंगररांगा आणि ग्रामसमुदाय यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत त्यांनी अनेक संशोधन लेख, पुस्तके आणि अभ्यास अहवाल सादर केले.
डॉ. गाडगीळ यांनी देश-विदेशातील अनेक नामांकित संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधन केले. भारतीय विज्ञान अकादमीसह विविध शैक्षणिक संस्थांशी ते दीर्घकाळ जोडलेले होते. डॉ. माधव गाडगीळ यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र तसेच नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधन केले. ते भारतीय विज्ञान संस्थेत (IISc) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
हे ही वाचा:
प्रदूषणामुळे श्वास घेणे कठीण होत आहे?
उद्धव ठाकरेंशी केलेल्या युतीचा राज यांना सर्वात मोठा फटका
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात
थंडीमध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या स्किन केअर टिप्स
डॉ. गाडगीळ हे पंतप्रधानांच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. तसेच ‘पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ पॅनेल’ (WGEEP) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी वैज्ञानिक, समतोल आणि दूरदृष्टीपूर्ण धोरण मांडले. त्यांच्या अहवालाने पर्यावरण संरक्षणाबाबत देशभरात गंभीर चर्चा सुरू झाली. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. पद्मश्री पुरस्कार (१९८१), पद्मभूषण पुरस्कार (२००६), शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (१९८६), टाइलर पुरस्कार (२०१५), संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार (२०२४).
