भारतविरोधी नेता हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेश पेटला

ढाक्यात हिंसाचार भडकला

भारतविरोधी नेता हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेश पेटला

sharif-usman-hadi-mrutyu-dhaka-hinsa

बांगलादेशी राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्ती आणि बंडखोरी घडवून आणणाऱ्या विद्यार्थी चळवळीतील शरीफ उस्मान हादीचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला. ३२ वर्षीय हादी हा इन्कलाब मंचाचा संयोजक होता आणि जून २०२४ च्या विद्यार्थी निदर्शनांच्या नावाखाली हिंसाचार भडकवणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक होता. याच प्रदर्शनांमुळे शेख हसीना सरकार उलथून पडले. दरम्यान १२ डिसेंबर रोजी ढाक्यात हादीला गोळ्या घालून हत्येचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर त्याला उपचारासाठी सिंगापूरला नेण्यात आले. १८ डिसेंबर २०२५ रोजी उपचारादरम्यान भारतविरोधी गरळ ओकणाऱ्या हादीचा शेवट झाला.

आगामी फेब्रुवारी २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शरीफ उस्मान हादी स्वतंत्र उमेदवार म्हणून सक्रियपणे प्रचार करीत होता. विद्यार्थी चळवळीदरम्यान आणि नंतर त्याच्या कट्टरपंथी इस्लामी भूमिकेसाठी, उघड भारतविरोधी विधानांसाठी ओळखले जात होते. हादीने सोशल मीडियावर तथाकथित “ग्रेटर बांगलादेश” चे नकाशे शेअर केले होते, ज्यात भारताचे पश्चिम बंगाल, बिहार आणि संपूर्ण ईशान्य राज्ये बांगलादेशचा भाग म्हणून दाखवली गेली होती, तर जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवला होता. हादीच्या टोकाच्या इस्लामी विचारामुळे आणि भारतविरोधी भूमिकेमुळे तो त्याच्या देशातील इस्लामिक अतिरेक्यांमध्ये लोकप्रिय व्यक्ती बनला.

हादीच्या मृत्यूमुळे बांगलादेशच्या अनेक भागात, विशेषतः ढाकामध्ये हिंसक निदर्शने सुरु आहेत. इन्कलाब मंच आणि इतर इस्लामी कट्टरपंथी संघटनांशी संबंधित निदर्शकांनी दंगली उसळवल्या आहेत, डैली प्रथम आलो आणि द डेली स्टार सारख्या प्रमुख वृत्तपत्रांच्या कार्यालयांची तोडफोड केली आणि जाळपोळ केली आहे. निदर्शकांनी या माध्यमांवर पक्षपातीपणाचा आरोप केला. शिवाय, जमावाने नारे देत, भारतीय राजदूतांना लक्ष्य केले आहे, भारतविरोधी घोषणा देत दगडफेक सुरु आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, बांगलादेशचे अंतरिम सरकार चालवणारे मुहम्मद युनूस यांनी २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. सरकार आणि सुरक्षा संस्था परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान हादीवरील हल्ल्याच्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास यंत्रणांनी या प्रकरणात ३५ वर्षीय फैसल करीम मसूदला मुख्य संशयित म्हणून धरले आहे. मसूद हा छात्र लीग या विद्यार्थी संघटनेचा माजी नेता आहे.

हादीच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारामुळे बांगलादेशातील राजकीय अस्थिरता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांची भूमिका आणि बांगलादेशचे शेजारील देशांशी असलेले संबंध यावर भारतातही विचारमंथन सुरू झाले आहे.

हे ही वाचा:

‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर ‘बाहुबली’ला दिला धोबी पछाड

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील ९ वा आरोपी यासिर अहमद दार अटकेट

इथिओपियानंतर ओमानकडून पंतप्रधान मोदींना दिला सर्वोच्च नागरी सन्मान

Exit mobile version