वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२५ (WCL) मधील सर्वाधिक चर्चित सामना — इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार रविवार रात्री 9 वाजता एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळावयाचा हा सामना काही खेळाडूंनी सहभाग नाकारल्यामुळे रद्द करण्यात आला.
WCL संघटनेने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे,
“आम्ही WCL मध्ये केवळ क्रिकेटवर प्रेम करतो. भारत-पाकिस्तान यांच्यातील हॉकी, व्हॉलीबॉल अशा इतर सामन्यांचे उदाहरण पाहून आम्हाला वाटले की क्रिकेटद्वारेही सकारात्मक आठवण निर्माण करावी, परंतु कदाचित आम्ही काहींच्या भावना अनाहूतरीत्या दुखावल्या असतील.”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की,
“भारताचे काही माजी महान खेळाडू या सामन्यामुळे अस्वस्थ झाले. त्यामुळे आम्ही हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, याबद्दल क्षमस्व आहोत.”
🇮🇳 शिखर धवनचा ठाम निर्णय
भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याने आधीच या सामन्यातून माघार घेतली होती. शनिवारी रात्री त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं:
“११ मे रोजी जो निर्णय घेतला, त्यावर आजही ठाम आहे. माझ्यासाठी देश सर्वप्रथम आहे, आणि देशापेक्षा मोठं काहीच नाही. जय हिंद!“
त्याच्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं की,
“शिखर धवन पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही सामन्यात सहभागी होणार नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील सध्या असलेली तणावपूर्ण स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.”
🔥 पार्श्वभूमी – ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सुरक्षा चिंता
२२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याची जबाबदारी द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध कठोर प्रत्युत्तर दिलं होतं.
