लॉस एंजेलिसच्या रस्त्यांवर पारंपरिक गटका मार्शल आर्टचे प्रदर्शन करणाऱ्या एका शीख व्यक्तीवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ही घटना अमेरिकेतील शीख समाजात आणि मानवाधिकार संघटनांमध्ये तीव्र संतापाचे कारण ठरत आहे.
गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गुरप्रीत सिंह (३५) असे आहे. ते रस्त्याच्या मध्यभागी पारंपरिक खांडा (दोन धार असलेली तलवार) वापरून गटका सादर करत होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या हातातील शस्त्राला मॅशेटी (मोठी सुरी) समजले.
कशी घडली घटना
१३ जुलैच्या सकाळी लॉस एंजेलिस पोलिसांना माहिती मिळाली की, क्रिप्टो डॉट कॉम अरेनाजवळील चौकात एक व्यक्ती मोठी तलवार फिरवत आहे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करत आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता गुरप्रीत सिंह अंगात फक्त बनियन, शॉर्ट्स आणि निळी पगडी घालून रस्त्याच्या मध्यभागी तलवार फिरवत असल्याचे दिसले.पोलिसांनी वारंवार त्याला शस्त्र खाली ठेवण्याचा आदेश दिला. पण त्याने नकार दिला आणि तलवारीने स्वतःची जीभ कापली, असे ABC7 च्या वृत्तानुसार दिसून आले. परिस्थिती ताणली गेली आणि तो व्यक्ती अचानक एका कारमध्ये बसून घटनास्थळावरून पळून गेला. पळ काढताना त्याने अनेक गाड्यांना धडक दिली आणि कारच्या खिडकीतून तलवार दाखवत राहिला.
गोळीबार कसा झाला?
कार थांबल्यानंतर, गुरप्रीत सिंह तलवार घेऊन पोलिसांकडे धाव घेत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
“मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले”
भारत आधीच हिंदू राष्ट्र आहे, त्याला कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही: मोहन भागवत
“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”
“पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे”
गटका म्हणजे काय?
गटका हा शीख परंपरेतील प्राचीन युद्धकला प्रकार आहे. यामध्ये तलवार, भाला, ढाल, लाठी यांसारखी विविध शस्त्रे वापरली जातात. हा प्रकार प्रामुख्याने शीख धार्मिक उत्सव, जत्रा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादर केला जातो.
यात वापरली जाणारी खांडा तलवार ही धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जाते.
वाद आणि संताप
शीख समुदायाची प्रतिक्रिया – गुरप्रीत सिंह धार्मिक व सांस्कृतिक कलेचे प्रदर्शन करत होते, पण पोलिसांनी गैरसमज करून प्राणघातक पावले उचलली. मानवाधिकार संघटनांचे मत – पोलिसांनी परिस्थिती शांत करण्यासाठी कमी प्राणघातक पद्धती (जसे की टेझर गन, रबर बुलेट्स) वापरू शकल्या असत्या. थेट गोळीबार अनावश्यक होता. पोलिसांनी म्हटले आहे की, त्या व्यक्तीने वारंवार आदेश न पाळता पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी गोळीबार आवश्यक होता.
पुढील कायदेशीर पावले
या घटनेचा तपास लॉस एंजेलिस पोलिस खात्याच्या इंटरनल अफेअर्स डिपार्टमेंटकडून सुरू आहे. शीख संस्थांनी अमेरिकन सरकारकडे न्यायालयीन चौकशी आणि जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लॉस एंजेलिसमधील शीख समाजाकडून याविरोधात मोठे आंदोलन उभारले जाण्याची शक्यता आहे.
