गावाची लोकसंख्या १३००; पण जन्म मृत्यू दाखले २७ हजार

एसआयटी चौकशी सुरू

गावाची लोकसंख्या १३००; पण जन्म मृत्यू दाखले २७ हजार

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या शेंदूरसनी ग्रामपंचायतीमध्ये जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या नोंदणीमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने राज्य गृह विभागाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून सखोल चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडून याबाबत सोमवारी अधिकृत प्रेसनोट जारी करण्यात आला.

सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम (CRS) सॉफ्टवेअरच्या नोंदी तपासताना ही धक्कादायक बाब समोर आली. शेंदूरसनी ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे १,३०० इतकी असताना, CRS प्रणालीद्वारे तब्बल २७ हजारांच्या आसपास जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तयार झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. ही आकडेवारी गावाच्या लोकसंख्येशी पूर्णपणे विसंगत असून, डिजिटल नोंदणी प्रणालीचा गैरवापर, फेरफार किंवा फसवणुकीचा संशय अधिक बळावला आहे.

या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३३७, ३३६(३), ३४०(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६५ व ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर तपास यवतमाळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता या तपासाची धुरा एसआयटी कडे सोपवण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र सायबर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एसआयटी मध्ये आरोग्य सेवा उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

भारत ५०० गीगावॅट स्वच्छ वीज लक्ष्य गाठण्याच्या मार्गावर

नोवाक जोकोविच यांचा राजीनामा

विजय हजारे ट्रॉफीत मुंबईची धुरा श्रेयस अय्यरकडे

बांगलादेशात आणखी एका हिंदू युवकाची हत्या

तपासादरम्यान आयपी लॉग्सचे तांत्रिक विश्लेषण, संशयित प्रमाणपत्रांच्या नावाने नोंद झालेल्या व्यक्तींची चौकशी तसेच संपूर्ण कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार आहे.
दरम्यान, एसआयटी कडून लवकरच शेंदूरसनी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन स्थलपातळीवर पडताळणी करण्यात येणार असून, प्रणालीतील त्रुटी आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.

Exit mobile version