विजय हजारे ट्रॉफीसाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोन सामने खेळणार

विजय हजारे ट्रॉफीसाठी सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोन सामने खेळणार

भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील दोन सामन्यांसाठी उपलब्ध असतील. या दोन्ही खेळाडूंनी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) ला ६ आणि ८ जानेवारी रोजी होणाऱ्या सामन्यांसाठी आपली उपलब्धता कळवली आहे.

मुंबई संघ आपला पहिला साखळी सामना २४ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये सिक्कीमविरुद्ध खेळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ६ जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरतील. त्यानंतर ८ जानेवारी रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठीही हे दोघे उपलब्ध असतील.

बीसीसीआय ने आपल्या करारातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये अधिक सहभाग घेण्यावर भर दिला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांनी स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाने परवानगी दिल्यास खेळाडूंनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत खेळलेल्या भारतीय खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफीत किमान दोन सामने खेळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान ११ ते १८ जानेवारीदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर २१ ते ३१ जानेवारीदरम्यान पाच टी-२० सामन्यांची मालिका होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान भारतीय खेळाडूंना जवळपास एक महिन्याचा ब्रेक मिळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ टी20 विश्वचषक 2026 मोहिमेला सुरुवात करेल.

दरम्यान, मुंबई संघाचे पहिल्या दोन सामने २४ डिसेंबरला सिक्कीमविरुद्ध आणि २६ डिसेंबरला उत्तराखंडविरुद्ध असून, हे दोन्ही सामने जयपूरमध्ये होणार आहेत. रोहित शर्मा आणि मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूर सोमवारी जयपूरला पोहोचतील आणि मंगळवारी सराव सत्रात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील ४ सामन्यांत केवळ ३४ धावा केल्या असून त्याची सरासरी ८.५० इतकी राहिली होती. स्वतः कर्णधारानेच मान्य केले होते की, सध्या त्याची फॉर्म साथ देत नाही.

Exit mobile version