दोडामार्ग तालुक्यातील अतिदुर्गम भागातील हेवाळे गावची अनुजा देसाई ही विद्यार्थिनी आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर थेट IIT दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. गरिबीच्या कठीण परिस्थितीशी दोन हात करत, अनुजाने १२वीमध्ये ९६ टक्के गुण मिळवले असून, JEE परीक्षेत EWS प्रवर्गातून ५८८ वा राष्ट्रीय क्रमांक मिळवत उच्च शिक्षणासाठी पात्रता सिद्ध केली आहे.
अनुजाचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी असून घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अशा वेळी तिच्या IIT दिल्लीमधील शिक्षणासाठी लागणारा खर्च उचलणे घरासाठी अशक्यप्राय ठरत होते. यावेळी मुंबईस्थित रंगशलाका या बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य कंपनीचे संस्थापक आनंद आशालता काशिनाथ शेट्ये यांनी पुढाकार घेत अनुजाच्या संपूर्ण शिक्षणाचा आर्थिक भार उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत संधू पॅलेसमध्ये संशयित व्यक्तीचा प्रवेश
भारताच्या सरासरी महागाई दरात ३ टक्क्यांची घट
निवडणुकीवेळीच काँग्रेसला आठवतात मागासवर्गीय
आनंद शेट्ये यांचा जन्म दोडामार्ग तालुक्यातील खानयाळे या गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत व्यवसायात यश मिळवले असून, समाजातील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला आहे. अनुजाच्या बाबतीतही त्यांनी तीच सामाजिक बांधिलकी जपली.
अनुजाच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, आनंद शेट्ये यांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक केले जात आहे. त्यांच्या या उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश गेला असून, आर्थिक अडचणी असूनही गुणवंत विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
