टाटा आयपीएल 2022 साठीचा खेळाडूंचा लिलाव अखेर पूर्ण झाला आहे. शनिवार १२ फेब्रुवारी आणि रविवार १३ फेब्रुवारी दुपारी १२ वाजल्यापासून रात्री पर्यंत हा लिलाव सुरु होता. या लिलावात अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या असून आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक खेळाडूंवर कोणीच बोली लावली नाही तर अनेक युवा खेळाडूंवर पैशाची झालेली पाहायला मिळाली.
लिलावाच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियम लिविंगस्टोन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्स या संघाने तब्बल ११.५० कोटी रुपये मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतला. तर नुकतेच १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय संघातील युवा खेळाडूंनाही कोट्यावधीची बोली लागताना दिसली. १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात अंतिम सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली असे अष्टपैलू खेळाडू राज बावा याला तब्बल दोन कोटी रुपयात पंजाब संघाने विकत घेतला. तर राजवर्धन हंगरगेकर या अष्टपैलू खेळाडूसाठी चेन्नई सुपर किंग्स संघाने दीड कोटीची बोली लावली.
लिलावाच्या पहिल्या दिवशी तुलनेने शांत वाटणारा मुंबईचा संघ दुसऱ्या दिवशी पूर्ण जोमाने लिलावात सहभागी झाला. त्यांनी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी आठ कोटी रुपये मोजले. तर सिंगापूरचा धमाकेदार अष्टपैलू खेळाडू टीम डेव्हिड याला सव्वा आठ कोटी रुपये मोजत ताफ्यात सामील करून घेतले. विशेष म्हणजे जोफ्रा आर्चर हा या वर्षीच्या स्पर्धेसाठी उपलब्ध नसणार आहे. तरीही मुंबई संघाने त्याच्यावर डाव खेळला आहे.
हे ही वाचा:
गोवेकरांची पसंती कोणाला असणार?
उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?
धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
उत्तराखंड, गोव्यासाठी मतदार देणार कौल! उत्तर प्रदेशमध्येही होणार मतदान
विशेष म्हणजे एकीकडे तरुण खेळाडूंसाठी कोट्यावधींच्या बोलीची चढाओढ होत असतानाच अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू मात्र अनसोल्ड गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार ऍरॉन फिंच, इंग्लंडचा इऑन मॉर्गन, भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांचा समावेश आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी देखील असेच चित्र दिसले असून ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, मिस्टर आयपीएल म्हणून नावाजला गेलेला सुरेश रैना यांच्यासाठी कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.
दुसऱ्या दिवसाचा लिलाव संपल्यानंतर सर्व संघांचे चित्र स्पष्ट झाले असून हे दहा संघ आता आयपीएलच्या चषकावर नाव कोरण्यासाठी लवकरच आपसात भिडताना दिसतील. सध्या भारतातील कोविड परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी मिळून आयपीएलचे सामने खेळले जाणार असल्याची माहिती आत्ताच्या घडीला पुढे येत आहे.
