ठाकरे बंधू एकाच मंचावर, जल्लोष माध्यमांच्या कार्यालयात!

माध्यमांच्या दांभिक आणि दुटप्पी वर्तनामुळे त्यांची विश्वासार्हता धोक्यात

ठाकरे बंधू एकाच मंचावर, जल्लोष माध्यमांच्या कार्यालयात!
गेले दोन दशके पक्के वैरी बनून एकमेकांवर आरोपांची राळ उडवणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरेंनी एकीच्या आणाभाका घेत मुंबईत स्वघोषित विजय मेळाव्याचा ‘ग्लॅमरस इव्हेन्ट’ साजरा केला. एरवी खुल्या मैदानात सभा, मेळावे भरवून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठाकरेंचा हा कौटुंबिक मनोमिलन सोहळा मात्र बंदिस्त सभागृहात झाला. शिवसैनिकांचा नेहमीचा उत्साह या कार्यक्रमात नव्हता. पण स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ, निष्पक्षपाती वगैरे विशेषणे लावून घेणाऱ्या वेगवेगळ्या मराठी माध्यमांच्या न्यूजरूममध्ये मात्र माध्यमकर्मींनी ठाकरे बंधू एकत्र येण्याचा जोरदार जल्लोष केल्याचे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. त्यामुळे माध्यमांनी पांघरलेला निष्पक्षपातीपणाचा बुरखा फाटला आहे आणि पत्रकारितेतील संधीसाधू, पक्षपाती, दांभिक, हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या द्वेष्ट्यांचा खरा चेहरा समोर आणला आहे.
मुंबईत वरळी डोममध्ये नुकत्याच झालेल्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकीच्या इव्हेंटमध्ये बोलताना उद्धव ठाकरे ‘एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी’ असे म्हणाले तेव्हा राज ठाकरेंच्या देहबोलीतून उत्साह नाही, तणाव जाणवत होता. दोन्ही पक्षांच्या सभा मेळाव्यांमध्ये एरवी कार्यकर्त्यांचा जो उत्स्फूर्त जोश असतो तो सुद्धा या कार्यक्रमाच्या वेळी सभागृहात जाणवत नव्हता. पण वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्सच्या न्यूजरूममध्ये मात्र एरवी दिल्लीतल्या नरेन्द्र मोदींच्या किंवा मुंबईतल्या देवेंद्र फडणवीसांच्या चांगल्या कामाची दखल घेणाऱ्या जागरूक पत्रकारांची ‘गोदी मीडिया’ म्हणून संभावना करून स्वतःच्या निष्पक्षपातीपणाचा टेंभा मिरवणारे माध्यमकर्मी मात्र या मनोमिलन सोहळ्याचा जल्लोष करत होते.
 

 

एबीपी माझाच्या न्यूजरूममधल्या वातावरणाचा जो व्हिडीओ व्हायरल झालाय त्यामध्ये तर ठाकरे बंधू मंचावर एकत्र चालत आले तेव्हा तिथे काम करणारे माध्यमकर्मी टाळ्या वाजवताना, शिट्ट्या मारताना, आनंदाच्या आरोळ्या मारताना दिसतात. साम टीव्हीच्या न्यूजरूममधल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही काही वेगळे वातावरण नाही. तिथेही टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या सगळे अगदी तस्सेच सुरू असलेले दिसते. ‘पुरोगामी’ वर्तुळात सतत घोटाळत राहणाऱ्या आणि मी हिंदू असूनही ‘बीफ’ खातो अशी फुशारकी मारणाऱ्या एका अँकरच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले. गोव्यातील एका वृत्तपत्राच्या न्यूजरूममध्येही असाच जल्लोष करण्यात आला.

या घटनेने महाराष्ट्रातील माध्यमकर्मींच्या मनात असलेल्या हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाबाबतच्या द्वेषबुद्धीचे प्रदर्शन झाले आहे. पत्रकारांना त्यांची स्वतःची व्यक्तिगत मते, आवडी-निवडी असण्यात काहीच वावगे नाही. परंतु न्यूजरूममध्ये, इतरत्र सार्वजनिक स्थळी किंवा वार्तापत्र सादर करताना पत्रकारांनी अगदीच सडेतोड आणि निष्पक्ष नाही तरी किमान समन्यायी भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

गेल्या दशकभरामध्ये ‘गोदी मीडिया’ ‘बिकाऊ मीडिया’ यासारखे शब्द प्रचलित झाले आहेत. विरोधी पक्षांचे नेते, एवढेच कशाला स्वतःला निष्पक्ष म्हणवून घेणारे वरिष्ठ पत्रकार देखील अनेकदा हे शब्द वापरून माध्यमे आणि भारतीय जनता पक्षांमध्ये काही ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचे भासवतात.

परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रातील माध्यमे कायमच हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात भूमिका घेत आलेली आहेत. काही माध्यमसंस्था जो पक्ष सत्तेत असेल त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसून आल्या आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना किंवा गेली दहा वर्षे मोदी यांच्या कारकिर्दीत अशा माध्यमसंस्था हिंदुत्ववादी संघटना, भारतीय जनता पक्ष यांच्या चांगल्या कामाची दखल घेताना दिसतात, पण यापूर्वी काँग्रेस किंवा अन्य पक्ष सत्तेत होते तेव्हा त्या माध्यमसंस्था त्या पक्षाची भलावण करताना देखील दिसून आल्या आहेत.

भारतातील माध्यम जगतामध्ये आपल्या भूमिकेबाबत कायमच संभ्रम राहिलेला दिसतो. एका बाजूला माध्यमांना विरोधी पक्षाची भूमिका बजावून आम्ही तुमच्यासाठी लढतो असे लोकांना भासवून द्यायची इच्छा असते. दुसऱ्या बाजूला सत्तेत आलेल्या पक्षाशी जवळीक साधून सरकारी जाहिराती, वेगवेगळ्या सवलती, लाभ, नियुक्त्या यांचा मलीदादेखील माध्यमे आणि माध्यमकर्मींना खुणावत असतो. त्याशिवाय स्वातंत्र्यानंतर काँग्रेसशी जवळचे संबंध असलेल्या आणि डाव्या परिसंस्थेतील स्वतःला पुरोगामी, बुद्धिवादी, तर्कवादी, सेक्युलर समजणाऱ्या लोकांचा व्यवस्था आणि यंत्रणांवर पगडा असल्याने माध्यमे आणि माध्यमसंस्थाना स्वतःला पुरोगामी, बुद्धिवादी, तर्कवादी, सेक्युलर सिद्ध करायचे असते. काँग्रेस आणि डाव्या परिसंस्थेने या संज्ञांचा अर्थच हिंदुत्वाला विरोध यापुरता मर्यादित केलेला असल्याने साहजिकच माध्यमांना आणि माध्यमकर्मींना हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांना टीकेचे लक्ष ठरवणे भाग पडते.

हे ही वाचा:

भाजपने टी राजा सिंह यांचा राजीनामा स्वीकारला!

लॉर्ड्समधलं गौरवस्थान: सचिन तेंडुलकरचं चित्र एमसीसी संग्रहालयात झळकणार!

आजपासून कावड यात्रा सुरू!

आयर्लंड आणि झिम्बाब्वेचा फलंदाज पीटर मूर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

या दांभिकतेमुळेच माध्यमांमधून पुलवामा हल्ल्याबाबतच्या निराधार वक्तव्यांना वारंवार प्रसिद्धी मिळत राहते. ‘असंतांचे संत’ यासारखे अग्रलेख मागे घेतले जातात. हिंदू दैवते, श्रद्धास्थाने यांच्याबाबतच्या अनर्गळ वक्तव्यांना ठसठशीत प्रसिद्धी मिळते. चॅनेलवर चर्चा सुरु असताना हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांच्या प्रवक्त्यांना त्यांचे मुद्दे मांडण्यापासून रोखले जाते.

माध्यमांच्या आणि माध्यमकर्मींच्या अशा दांभिक आणि दुटप्पी वर्तनामुळे त्यांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. आज समाजमाध्यमांच्या प्रसारामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आणि तातडीने माहिती उपलब्ध होऊ लागलेली आहे. माध्यमांनी जबाबदार पद्धतीने त्यांचे काम केले नाही तर लोकच माध्यमांकडे पाठ फिरवतील हे माध्यमसंस्था आणि माध्यमकर्मींनी लक्षात ठेवणे त्यांच्याच हिताचे आहे.

Exit mobile version