कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!

मासेमारीच्या हंगामापूर्वी देवीकडे नवस करण्याची परंपरा आजही जिवंत

कोळ्यांचं ग्रामदैवत ‘देवी गोल्फामाता’ ; १२ व्या शतकात यादव राजानं स्थापन केलेलं प्राचीन मंदिर!

देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरु असून आजचा तिसरा दिवस आहे. भाविक भक्तिभावाने देवीची पूजा करत आहेत. नवरात्री निमित्त भाविकांना विविध देवी, त्यांची रूपे, इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. याच पार्श्वभूमीवर आज (२४ सप्टेंबर) आपण वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या ग्रामदेवतेचा इतिहास जाणून घेणार आहोत. मुंबई ही सात बेटांनी बनली असून त्यातीलच एक वरळी कोळीवाडा आहे आणि त्याच परिसरात वसलेलं गोल्फादेवी मातेचं मंदिर.

विशेष म्हणजे, गोल्फादेवी मूर्तीची स्थापना १२ व्या शतकातील यादव कालीन वंशाचे शेवटचे वंशज बिंब राजा यांनी केली आहे. कोळी समाजाची ग्रामदेवता असलेली गोल्फादेवी ही केवळ श्रद्धेची नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीची शक्तिरूप प्रतिमा आहे. समुद्राशी नातं असलेल्या कोळी समाजासाठी, ही देवी समुद्रातील संकटांपासून रक्षण करणारी, मासेमारी यशस्वी करणारी आणि नौका सुखरूप परत आणणारी शक्ती मानली जाते.

वरळी कोळीवाड्याच्या समुद्रकिनारी वसलेलं गोल्फादेवीचं मंदिर हे कोळी समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मासेमारीसाठी निघण्याआधी, कोळी बांधव देवीचं दर्शन घेऊनच प्रवास सुरू करतात. देवीकडे नवस करणं, मनोकामना मागणं आणि यशस्वी परतीसाठी प्रार्थना करणं हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरात विशेष पूजांचा, पारंपरिक गोंधळ, भजन-कीर्तन, आणि कोळी नृत्य-गीतांचा रंग चढतो. कोळी स्त्रिया पारंपरिक पोशाखात देवीला साडी अर्पण करतात आणि घराघरांतून नवसपूर्तीचे कार्यक्रम आयोजित होतात. याशिवाय, मासेमारीच्या हंगामापूर्वी देवीकडे नवस करण्याची परंपरा आजही जिवंत आहे. एखाद्या वादळाचा धोका, कमकुवत मासेमारी किंवा आरोग्याच्या अडचणींमध्ये, कोळी समाज देवीकडे आर्ततेने धाव घेतो.

हे ही वाचा : 

‘वैभव’शाली फलंदाजी, १० सामन्यांत ४१ षटकारांचा विक्रमी पाऊस

वैद्यकीय शिक्षणामुळे कंटाळलेल्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

दिवाळीपूर्वी रेल कर्मचाऱ्यांच्या बोनसला मंजुरी

काँग्रेसची बैठक म्हणजे इंडी आघाडीवर प्रेशर पॉलिटिक्स

 

गोल्फादेवी – सामाजिक ऐक्याचं प्रतीक

गोल्फादेवी केवळ धार्मिक श्रद्धेची नव्हे, तर सामाजिक ऐक्य, परंपरा आणि समुद्राशी नातं घट्ट करणाऱ्या भावना जपणारी केंद्रबिंदू आहे. कोळी समाजामध्ये गोल्फादेवी ही संकटात धीर देणारी, आणि समाजाला एकत्र बांधून ठेवणारी शक्ती मानली जाते. गोल्फादेवी ही केवळ एक देवी नाही, ती वरळीच्या कोळी समाजाचा श्वास, श्रद्धा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. बदलत्या काळातही तिचं मंदिर आणि तिची उपासना ही मुंबईच्या सांस्कृतिक नकाशावर एक जिवंत ठसा उमटवते आहे.

Exit mobile version