पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त स्मारकाचे उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी एक स्मारक टपाल तिकिट आणि नाणे देखील प्रकाशित केले. तसेच वंदे मातरम वेबसाइटही लाँच करण्यात आली. यानंतर नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, हा उत्सव देशातील अनेक नागरिकांना नवीन प्रेरणा देईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “वंदे मातरम हे भारताच्या एकतेचे खरे प्रतीक आहे कारण या गीताने पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. या प्रसंगी भारतीय बंधू आणि भगिनींचे अभिनंदन. आज आपण वंदे मातरमची १५० वर्षे साजरी करत असताना, हे गीत नवीन प्रेरणा देईल आणि देशातील लोकांना नवीन उर्जेने भरेल,” असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “वंदे मातरम, हे शब्द एक मंत्र आहेत, एक ऊर्जा आहेत, एक स्वप्न आहेत, एक संकल्प आहेत. वंदे मातरम, हे शब्द भारतमातेची भक्ती आहेत, भारतमातेची आराधना आहेत. वंदे मातरम, हे शब्द आपल्याला इतिहासात परत घेऊन जातात. ते आपल्या वर्तमानाला नवीन आत्मविश्वासाने भरतात आणि आपल्या भविष्याला अशी आशा देतात की असा कोणताही संकल्प नाही जो साध्य करता येत नाही, असे कोणतेही ध्येय नाही जे आपण भारतीय साध्य करू शकत नाही.” पुढे ते म्हणाले की, गुलामगिरीच्या काळात, वंदे मातरम् हे भारतमातेच्या, स्वातंत्र्यासाठीच्या संकल्पाची घोषणा बनले. देशातील लाखो महापुरुषांना, भारतमातेच्या मुलांना, वंदे मातरमसाठी आपले जीवन समर्पित केल्याबद्दल आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
हे ही वाचा:
“वंदे मातरम्” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त टपाल तिकिट, नाणे प्रकाशित
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १०० हून अधिक उड्डाणे विलंबाने! कारण काय?
कर्ज फसवणूक प्रकरणात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने निधी वळवल्याचा सापडला पुरावा
पुढील वर्षी ट्रम्प भारत दौऱ्यावर? काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की, बंकिमचंद्रांचे ‘आनंदमठ’ ही केवळ एक कादंबरी नाही, तर ती स्वतंत्र भारताचे स्वप्न आहे. आनंदमठातील वंदे मातरमचा संदर्भ, त्याची प्रत्येक ओळ, बंकिमबाबूंचे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना, या सर्वांचा खोलवर अर्थ होता आणि अजूनही आहे. हे गाणे गुलामगिरीच्या काळात रचले गेले होते, परंतु त्याचे शब्द कधीही गुलामगिरीच्या सावलीत मर्यादित नव्हते. ते गुलामगिरीच्या आठवणींपासून कायमचे मुक्त राहिले. म्हणूनच वंदे मातरम या गीताने प्रत्येक युगात अमरत्व प्राप्त केले आहे.
