मुंबईतील गोरेगावमध्ये घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

शनिवारी पहाटे घडली दुर्दैवी घटना

मुंबईतील गोरेगावमध्ये घरात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबईतील गोरेगाव येथे शनिवारी पहाटे घरात लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १९ वर्षांची तरुणी आणि १२ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनीही तातडीने धाव घेत अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, घरात झोपलेल्या तीन जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

गोरेगाव (पश्चिम) येथील भगतसिंग नगर भागात शनिवारी पहाटे तळ मजल्यावरील घरात आग लागली. फ्रीजचा मोठा स्फोट होऊन ही आग लागली, अशी प्राथमिक माहिती आहे. प्रथम ती आग प्रामुख्याने तळमजल्यावरील विद्युत वायरिंग आणि घरगुती वस्तूंपर्यंत मर्यादित होती, मात्र ती नंतर पसरली आणि पहिल्या मजल्यावर पोहचली. पहाटेच्या सुमारास ही आग लागली तेव्हा सगळेच गाढ झोपेत होते. मात्र आगीच्या ज्वाळा दिसताच, आग लागल्याचे समजतातच इमारतीतील नागरिकांनी फायर ब्रिगेडला फोन केला. तसेच ते जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत स्थानिकांनी बादल्यांमधून पाणी ओतत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वीजचे कनेक्शन बंद करून फायर पब्रिगेडच्या जवानांनीही आगीवर नियंत्रण मिळवत ती पूर्णपणे विझवली.

हे ही वाचा..

इराणमध्ये निदर्शनांना हिंसक वळण; सुरक्षा दलांकडून अनेक ठिकाणी गोळीबार

भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑडी कारने पादचाऱ्यांना चिरडले; एकाचा मृत्यू

व्हेनेझुएलाचे तेल भारताला विकण्यास अमेरिका तयार पण… काय म्हणाले ट्रम्प?

सकाळी खावी उकडलेली कडधान्ये! आरोग्यासाठी का आहेत फायदेशीर?

आगीच्या ज्वाळांमुळे जखमी झालेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आणि उपचारांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीमुळे होरपळलेल्या तिघांचाही रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. हर्षदा पावसकर (१९), कुशल पावसकर (१२) आणि संजोग पावसकर (४८) अशी मृतांची नावे आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिघेही गंभीर भाजले होते. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पूर्णपणे विझवली आहे.

Exit mobile version