केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे अमित शाह शनिवारी शनिवारी जाहीर केले की, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC), ज्याला ‘शिखर संघटना’ म्हणूनही ओळखले जाते, त्याचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत हलवण्यात येणार आहे.
दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील शारदा सदन येथे NUCFDCच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी त्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमात NUCFDC आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU) यांच्यात शहरी सहकारी बँकांसाठी केंद्रीकृत सायबर सुरक्षा प्रणाली स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत या सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली.
मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘सहकार नव-क्रांती मेळाव्या’ला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’ची स्थापना देशातील शहरी सहकारी बँकिंग चळवळीला नवसंजीवनी देईल आणि तिच्या विस्ताराला चालना देईल.
हे ही वाचा:
निवडणुकीशिवाय सत्तापालटाची १९८ सूत्रे…
शरीफ सरकार गुडघ्यावर…पीओके आंदोलक दहशतवादी नव्हेतर ‘देशभक्त’
भारतीय शेअर बाजारात परदेशी पैसा खुळखुळला
भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव
ही संस्था शहरी सहकारी बँकांना तंत्रज्ञानाच्या, प्रशासकीय आणि नियामक पातळीवर अधिक सक्षम करण्यासोबतच त्यांच्या बँकिंग सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले. अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक शहरी सहकारी बँका आहेत आणि सहकार चळवळीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र हे तिचे प्रमुख केंद्र राहिले आहे. सध्या राज्यात ४४९ शहरी सहकारी बँका कार्यरत आहेत.
ते म्हणाले, “अंब्रेला ऑर्गनायझेशनचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्याचा प्रस्ताव शनिवारी सकाळी संस्थेसमोर ठेवण्यात आला आहे. कारण महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये देशातील जवळपास ७० टक्के शहरी सहकारी बँका आहेत. त्यामुळे सहकारी बँकिंगची कामकाजाची मोठी व्याप्ती असलेल्या प्रदेशातच या संस्थेचे मुख्यालय असले पाहिजे.”
ते म्हणाले की, दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली शिखर संघटना आता अस्तित्वात आली असून तिला भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मान्यताही मिळाली आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन हे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण यश असल्याचे त्यांनी सांगितले.
८ ऑगस्टच्या ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करताना अमित शाह म्हणाले की, याच दिवशी १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो आंदोलना’चे आवाहन केले होते. ते म्हणाले, “याच ऐतिहासिक दिवशी देशातील प्रत्येक तहसील स्तरावर सहकारी बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.”
शिखर संघटनेचे नवीन कार्यालय ज्या इमारतीत स्थापन करण्यात आले आहे, त्या वास्तूच्या ऐतिहासिक महत्त्वावरही केंद्रीय मंत्र्यांनी प्रकाश टाकला. जवळपास १०० वर्षे या इमारतीचा वापर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या ऐतिहासिक ट्रेडिंग हॉल म्हणून करण्यात आला होता आणि भारताच्या भांडवली बाजाराच्या कामकाजाचे हे एक प्रमुख केंद्र राहिले होते.
अमित शाह म्हणाले की, शिखर संघटनेचा उद्देश शहरी सहकारी बँकांना तांत्रिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, पेमेंट प्रणाली आणि आधुनिक बँकिंग सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे.
ते म्हणाले, “देशातील सर्व १,४०० शहरी सहकारी बँकांनी या सेवा, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान प्रणाली स्वतंत्रपणे खरेदी करून त्यांची देखभाल केली, तर त्यासाठीचा खर्च अत्यंत मोठा असेल. त्याउलट, अंब्रेला ऑर्गनायझेशन सर्व बँकांच्या वतीने सामूहिक करार करेल, आवश्यक सॉफ्टवेअरची खरेदी करेल आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी घेईल. त्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि छोट्या बँकांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल.”
