भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष अत्यंत यशस्वी ठरले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताच्या विजयात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांचा मोलाचा वाटा होता.
भारतीय संघाचा माजी दिग्गज गोलंदाज आर. अश्विन यांनी वरुण चक्रवर्ती यांना २०२५ सालातील सर्वोत्तम भारतीय गोलंदाज ठरवले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाले,
“वरुण हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक संधीमध्ये तो ‘एक्स-फॅक्टर’ ठरला आहे. फलंदाजांसाठी त्याला वाचणे नेहमीच कठीण गेले आहे. माझ्या मते, तो या वर्षातील भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये त्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे.”
अश्विन पुढे म्हणाले,
“वरुणचा पहिला व्यवसाय क्रिकेट नव्हता. तो एक आर्किटेक्ट होता. एक काळ असा होता की तो क्रिकेटपासून जवळपास बाहेर पडला होता. मात्र त्याने जबरदस्त पुनरागमन केले. चेन्नईतील घरगुती क्रिकेट, त्यानंतर तमिळनाडू प्रीमियर लीग आणि आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. आज तो आयसीसी क्रमवारीतील क्रमांक एक टी-२० गोलंदाज आहे, हे खरोखरच स्मरणीय आहे.”
वरुण चक्रवर्तीसाठी २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची जागा पक्की करणारे ठरले आहे. वनडे असो किंवा टी-२०, जिथे जिथे संधी मिळाली तिथे त्याने प्रभावी कामगिरी केली. या वर्षात त्याने ४ वनडे सामन्यांत १० विकेट्स घेतल्या, तर २० टी-२० सामन्यांत ३६ विकेट्स त्याच्या नावावर आहेत.
टी-२० विश्वचषक २०२६च्या पार्श्वभूमीवर वरुण चक्रवर्तीची कामगिरी भारतासाठी अत्यंत आशादायक मानली जात आहे. हा विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फेब्रुवारी–मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. दोन्ही देशांतील खेळपट्ट्या फिरकीला पोषक मानल्या जातात. वरुणच्या गूढ फिरकीला जगभरातील फलंदाजांना वाचणे कठीण गेले आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात त्याच्याकडून निर्णायक कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत त्याने ३३ टी-२० सामन्यांत ५५ विकेट्स घेतल्या आहेत.
