रुग्णालयातील निष्काळजीपणाचा बळी? छताचा पंखा कोसळून रुग्णाचा मृत्यू

दिल्लीतील जीटीबी रुग्णालयातील धक्कादायक घटना

रुग्णालयातील निष्काळजीपणाचा बळी? छताचा पंखा कोसळून रुग्णाचा मृत्यू

दिल्लीतील गुरू तेग बहादूर (GTB) रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर छताचा पंखा कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

माहितीनुसार, ४२ वर्षीय मोहम्मद अकबर यांना प्रकृती गंभीर असल्याने १८ जुलै रोजी जीटीबी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास वॉर्ड क्रमांक २७ मधील एका क्युबिकलमध्ये उपचार सुरू असतानाच छतावरील पंखा अचानक तुटून थेट त्यांच्या बेडवर कोसळला. या घटनेत रुग्णासोबत एक पुरुष परिचारकही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पंखा कोसळल्यानंतर रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. मात्र, घटनेनंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी रुग्णालयातील देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ही घटना गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, जीटीबी रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णाचा मृत्यू पंखा अंगावर पडल्यामुळे नव्हे, तर आधीपासून असलेल्या गंभीर आजारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. रुग्णालयाच्या निवेदनानुसार, मोहम्मद अकबर यांना अनियंत्रित उच्च रक्तदाब, स्ट्रोक किंवा एन्सेफॅलोपॅथी, ॲस्पिरेशन न्यूमोनिया आणि श्वसन निकामी होण्यासारख्या गंभीर आरोग्य समस्या होत्या. मृत्यूचे कारणही त्याच वैद्यकीय गुंतागुंती असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयाने प्राथमिक तपासात पंख्याचा शाफ्ट तुटल्यामुळे तो खाली पडल्याचे सांगितले असून, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) संबंधित पंख्याची दुरुस्ती केली आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

युद्धाच्या धगीचा भारतीय शेअर बाजाराला फटका; तरी ‘हे’ सेक्टर सुपरहिट!

देशभर पुन्हा बरसणार पाऊस; अनेक राज्यांत मुसळधार सरी

सलग नवव्या रात्री अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले

बंडखोर खासदारांसाठी स्वतंत्र आसनांमुळे सर्वपक्षीय बैठकीत गोंधळ

मात्र, मृताच्या कुटुंबीयांनी आणि काही प्रत्यक्षदर्शींनी रुग्णालयाच्या स्पष्टीकरणावर समाधान व्यक्त केलेले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्डमधील अनेक एअर कंडिशनर बंद अवस्थेत किंवा निकामी होते. त्यामुळे रुग्णांना छतावरील पंख्यांवर अवलंबून राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील पायाभूत सुविधांची दुरवस्था आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version