फडणवीसांनी गडचिरोलीसाठी आणली भलीमोठी गुंतवणूक

दावोसमध्ये ३८ हजार कोटींचे करार, गडचिरोलीसाठी ५ हजार कोटी

फडणवीसांनी गडचिरोलीसाठी आणली भलीमोठी गुंतवणूक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामधून राज्यात हजारो कोटींची गुंतवणूक होण्याचे लक्ष्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथे अनेक भेटीगाठी घेणार आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस परिषदेतून पहिल्या करारावर स्वाक्षरी करत गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणली आहे.

दावोस येथे सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रासाठी पहिला सामंजस्य करार हा ५,२०० कोटींचा झाला असून ही गुंतवणूक गडचिरोलीमध्ये करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलाद निर्मितीसाठी कल्याणी समूहाकडून कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये स्टील आणि संरक्षण क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या करारामधून तब्बल ४,००० रोजगार निर्मितीही होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा करार केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असून या जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

याव्यतिरिक्त आणखी दोन करार महाराष्ट्र सरकारने दावोसमध्ये केले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडसोबतही करार झाला असून तब्बल १६,५०० कोटींची गुंतवणूक राज्यात येणार आहे. यातून २,४५० रोजगार निर्मिती केली जाणार आहे. हा करार संरक्षण क्षेत्रासाठी केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे सतीश शेठ यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झाला.

हे ही वाचा : 

महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अशी दिसणार रश्मिका मंधाना

उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप!

देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!

अमेरिकेत घुसखोरांना स्थान नाही; ट्रम्प यांच्याकडून मेक्सिकोच्या सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी

तिसरा करार हा स्टील आणि मेटल्स या क्षेत्रात झाला असून तब्बल १७ हजार कोटींची गुंतवणूक याद्वारे राज्यात केली जाणार आहे. यातून ३,२०० रोजगार निर्मिती केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बालासोर अलॉयजचे सतीश कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये राज्य सरकार आणि बालासोर अलॉयज यांच्यात हा करार झाला. त्यामुळे राज्याला आतापर्यंत ३८,७५० कोटींची गुंतवणूक मिळाली आहे.

Exit mobile version