भारत दारूगोळा उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पुढे जात असून, भविष्यात जागतिक पातळीवर एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनण्याचा देशाचा मानस असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. ते नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राजनाथ सिंह यांनी सांगितले की भारताला पूर्वी दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र आता देशांतर्गत उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ होत आहे. आत्मनिर्भरता अद्याप पूर्णतः साध्य झाली नसली, तरी विविध प्रकारचा दारूगोळा आता भारतातच तयार होत असून ही प्रगती समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात युरोपियन संघ सार्वभौमत्वाचे अस्त्र वापरणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे उंबरगाव-तलासरीच्या चार पदरी रस्त्याची मागणी
“भारतात खेळा अन्यथा दुसऱ्या संघाला जागा द्या!”
खड्ड्यातल्या थंड पाण्यामुळे बुडालेल्या इंजिनियरला वाचवण्यात अपयश
ऑपरेशन ‘सिंदूर’ या लष्करी मोहिमेचा उल्लेख करताना त्यांनी युद्धाच्या काळात दारूगोळा किती निर्णायक ठरतो, हे अधोरेखित केले. या मोहिमेदरम्यान युद्धाची तीव्रता अधिक असल्याने आवश्यक साठा आणि उत्पादनक्षमता किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेची गरज अधिक ठळकपणे समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात त्यांनी सोलार डिफेन्स अँड अॅरोस्पेस लिमिटेड या कंपनीच्या मध्यम कॅलिबर दारूगोळा उत्पादनाच्या नव्या कारखान्याचे उद्घाटन केले. तसेच पिनाका रॉकेट्सची निर्यातीसाठी पहिली खेप पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. ही घटना भारताच्या संरक्षण निर्यातीसाठी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
संरक्षण उत्पादनाच्या आकडेवारीबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की २०१४ मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन सुमारे ₹४६,००० कोटी होते. ते आता वाढून ₹१.५१ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे. त्याचप्रमाणे संरक्षण निर्यात ₹१,००० कोटींपासून वाढून जवळपास ₹२५,००० कोटींवर पोहोचली आहे. २०३० पर्यंत ही निर्यात ₹५०,००० कोटींपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्यात खाजगी क्षेत्राचा सहभाग सुमारे ५० टक्केपर्यंत वाढवण्याची योजना आहे.
भारताचे संरक्षण उत्पादन मॉडेल सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागावर आधारित असून, हेच संयोजन देशाची मोठी ताकद असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. ही ताकद योग्य पद्धतीने वापरून भारताला भविष्यातील युद्धाच्या बदलत्या स्वरूपासाठी सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
