एनएसईच्या आयपीओचा मार्ग मोकळा

सेबीकडून ‘हिरवा कंदिल’

एनएसईच्या आयपीओचा मार्ग मोकळा

भारतीय भांडवली बाजारासाठी महत्त्वाची घडामोड घडली असून भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (SEBI) यांनी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांना ‘नो ऑब्जेक्शन’ दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्रीचा म्हणजेच आयपीओचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा आयपीओ काही कारणांमुळे दीर्घकाळ रखडला होता. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित मुद्दे, अंतर्गत सुधारणा आणि नियामक प्रक्रियेमुळे आयपीओ पुढे ढकलण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांत एनएसईने आपली कार्यपद्धती सुधारली, पारदर्शकता वाढवली आणि सेबीच्या नियमांचे पालन केले. त्यानंतर सेबीने आवश्यक तपासणी करून ‘नो ऑब्जेक्शन’ दिले आहे.
हे ही वाचा:
आत्मनिर्भरतेकडे भारताचे पाऊल! देशात L410 NG विमानाची निर्मिती होणार?

नागपाड्यात दोन गटांत हाणामारी; पाच जखमी, १२ जणांना अटक

अर्थसंकल्प विशेष: महागाईच्या मूल्यांकनाचा चेहरा मोहरा बदलणार

दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य

राष्ट्रीय शेअर बाजार हा देशातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज व्यवहारांमध्ये एनएसईचा मोठा वाटा आहे. निफ्टी निर्देशांकामुळे भारतीय शेअर बाजाराची दिशा ठरवण्यात एनएसईची महत्त्वाची भूमिका आहे. आयपीओमुळे एनएसईला भांडवल उभारता येणार असून, नवीन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि भविष्यातील विस्तारासाठी निधी उपलब्ध होणार आहे. तसेच सध्याच्या भागधारकांना आपले समभाग विकण्याची संधी मिळणार आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, एनएसईचा आयपीओ हा भारतीय भांडवली बाजारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मुंबई शेअर बाजाराच्या सूचीकरणानंतर आता एनएसईच्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मजबूत आर्थिक स्थिती आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या व्यवहारांमुळे या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता पुढील टप्प्यात एनएसईकडून आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केली जाणार असून, समभाग विक्रीची रचना आणि योग्य वेळ निश्चित केली जाईल. बाजारातील परिस्थिती पाहून आयपीओचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

एकूणच, सेबीकडून मिळालेल्या ‘नो ऑब्जेक्शन’मुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयपीओची प्रक्रिया पुढे जाणार असून, हा निर्णय भारतीय भांडवली बाजारासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version