मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने शेअर बाजार कोलमडला

सेन्सेक्स १८३६ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे सुमारे १३.६५ लाख कोटी बुडाले

मध्यपूर्वेतील तणाव वाढल्याने शेअर बाजार कोलमडला

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे देशांतर्गत बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. याआधी १९ मार्चलाही बाजारात मोठी पडझड झाली होती.

बाजार बंद होताना ३० शेअर्सचा सेन्सेक्स २.४६ टक्के म्हणजेच १८३६.५७ अंकांनी घसरून ७२,६९६.३९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० २.६० टक्के म्हणजे ६०१.८५ अंकांनी घसरून २२,५१२.६५ वर बंद झाला.

अमेरिका-इराण संघर्ष चौथ्या आठवड्यात प्रवेश केल्याने महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम जागतिक बाजारांवर झाला आहे. यामुळे सोमवारी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला आणि बाजार सुमारे २.५ टक्क्यांनी घसरला.

इंट्रा-डे व्यवहारात सेन्सेक्स ७३७३२.५८ वर उघडून एका टप्प्यावर १९७४.५ (२.६४टक्के) घसरत ७२,५५८.४४  या दिवसातील नीचांकी पातळीवर गेला. त्याचप्रमाणे निफ्टी ५०  २२,८२४.३५ वर उघडून एका वेळी ६४३ अंकांनी (२.७५ टक्के) घसरून २२,४७१.२५ पर्यंत खाली आला.

India VIX (निफ्टी अस्थिरता निर्देशांक) सोमवारी १९.११ टक्क्यांनी वाढून २७.१७ वर पोहोचला आणि शेवटी १७.१७ टक्के वाढीसह २६.७३ वर बंद झाला. विस्तृत बाजारात बेंचमार्कपेक्षा अधिक घसरण दिसली. निफ्टी मिडकॅपमध्ये 3.90 टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांकात 3.94 टक्क्यांची घसरण झाली.

सेक्टरनिहाय पाहता, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबलमध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि तो सर्वाधिक नुकसान करणारा क्षेत्र ठरला. निफ्टी रियल्टी (४.७४ टक्के) आणि निफ्टी मेटल (४.९७ टक्के) क्षेत्रांची कामगिरीही अत्यंत कमजोर राहिली.

याशिवाय, निफ्टी बँक ३.७२ टक्के, निफ्टी ऑटो ३.१६ टक्के, निफ्टी एफएमसीजी २.४९ टक्के तर निफ्टी आयटीमध्ये सर्वात कमी ०.१८ टक्क्यांची घसरण झाली.

या घसरणीमुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात (मार्केट कॅप) सुमारे १४ लाख कोटी रुपयांची घट झाली. हे मूल्य शुक्रवारी ४२८.७६ लाख कोटी रुपये होते, ते घसरून ४१५.११ लाख कोटी रुपये झाले.

मार्केट तज्ज्ञ सुनील शहा यांनी सांगितले की, नव्या आठवड्याचा पहिला दिवस गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खराब ठरला असून सेन्सेक्समध्ये १८०० अंकांहून अधिक घसरण झाली.घसरणीचे कारण स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, वीकेंडदरम्यान घडलेल्या घडामोडी आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या विधानामुळे बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्यांनी इशारा दिला की ४८ तासांत हॉर्मुझती सामुद्रधुनी खुली न झाल्यास इराणला गंभीर परिणाम भोगावे लागतील.

हे ही वाचा:

‘इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला’

पाक सुपर लीगमधील विदेशी खेळाडू वाऱ्यावर

‘धुरंधर २’ कडून चार दिवसांत ६०० कोटींचा टप्पा पार!

२० लाख अमेरिकन डॉलर्स मोजा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज घेऊन जा!

यावर प्रतिक्रिया देताना इराणनेही कठोर भूमिका घेतली असून, गरज पडल्यास आखाती देशांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे तणावपूर्ण वातावरण बाजारासाठी नकारात्मक संकेत देत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की भारत जागतिक बाजाराच्या ट्रेंडनुसार चालतो, त्यामुळे आज जवळपास सर्व मोठ्या बाजारांमध्ये घसरण दिसून आली. वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर (मॅक्रो) आणि कंपन्यांच्या नफ्यावर (अर्निंग्स) नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

भारत आपल्या ऊर्जा गरजांपैकी सुमारे ८० टक्के आयात करतो. त्यामुळे केवळ महाग तेलच नव्हे, तर हॉर्मुझमधील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याचा धोका आहे. त्यांनी शेवटी सांगितले की, जोपर्यंत या तणावपूर्ण परिस्थितीचे समाधान होत नाही आणि स्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होणे कठीण आहे. सध्या गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आणि नकारात्मकच आहे.

Exit mobile version