१.५ कोटींच्या फसवणूकीचा कट उधळला; बँक अधिकाऱ्यांनी दाखवली सतर्कता

लखनौमधील एक पीडिता डिजिटल अटकेत असताना पोलिसांनी केली कारवाई

१.५ कोटींच्या फसवणूकीचा कट उधळला; बँक अधिकाऱ्यांनी दाखवली सतर्कता

उत्तर प्रदेशच्या लखनौमधील एक पीडिता डिजिटल अटकेत असताना पोलिसांनी तब्बल १.५ कोटी रुपयांचा डिजिटल फसवणुकीचा कट उधळून लावला. विकास नगर पोलिसांनी सायबर बचाव मोहीम राबवली आणि पीडितेला ‘डिजिटल अटक’ अंतर्गत असताना हा फसवणूकीचा गुन्हा उधळून लावला.

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्यांनी चार दिवस मानसिकदृष्ट्या उषा शुक्ला (वय ७५ वर्षे) या विधवा महिलेला त्रास देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. तिच्या बचतीतून फसवण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. या बचाव मोहिमेत बँक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचाही वाटा होता.

पोलिसांना त्यांच्या अंतर्गत सूत्रांकडून माहिती मिळाली की, परिसरातील एका वृद्ध महिलेवर संशयित सायबर गुन्हेगारांचा दबाव आहे. वेळीच हस्तक्षेप करून, पोलिसांनी १.२१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवीचे आणि इतर गुंतवणुकीचे अकाली लिक्विडेशन थांबवण्यात यश मिळवले आणि महिलेची बँक खाती गोठवली. त्यांनी केंद्रीय एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या वाढत्या कार्यपद्धतीचाही पर्दाफाश केला.

आरोपींनी अधिक प्रामाणिक वाटण्यासाठी आणि वृद्ध महिलेला घाबरवण्यासाठी दिल्ली आणि काश्मीर दहशतवादी प्रकरणे निवडली. त्यांनी तिला मुदत ठेवी वेळेपूर्वीच मोडून काढण्याची आणि तिचे सर्व पैसे बचत खात्यात हस्तांतरित करण्याची सूचना देखील केली. डीसीपी (पूर्व) शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विकास नगर पोलिस ठाण्यात माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. परिसरातील रहिवासी असलेल्या वृद्ध महिलेला सीबीआय अधिकाऱ्यांची बतावणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींकडून वारंवार व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल येत होते, असे त्यांनी सांगितले.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला धमकी देऊन दावा केला होता की, तिच्या दिवंगत पतीचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड ५० कोटींच्या दहशतवादी निधीशी संबंधित मोठ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरण्यात आले आहे. त्यांनी तिला असेही सांगितले की हे पैसे काश्मीर आणि दिल्लीतील दहशतवादी घटनांमध्ये वापरले गेले आहेत आणि सीबीआयच्या पुणे युनिटकडून तिची चौकशी सुरू आहे. पीडितेच्या पतीचे पीडब्ल्यूडीमध्ये काम करणारे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. तिचा एक मुलगा एका खाजगी बँकेत काम करतो, तर दुसऱ्या मुलाचे निधन झाले आहे.

हे ही वाचा :

अमेरिकेकडून आणखी २० देशांवर प्रवास बंदी! कोणत्या देशांचा समावेश?

“तुम्ही या प्रजासत्ताकाचा भाग नाही का?”: सर्वोच्च न्यायालयाने द्रमुक सरकारला फटकारले

टी-२० मालिकेत भारताला धक्का; अक्षर पटेल बाहेर

८ सुवर्णांसह भारताची भव्य झेप

आरोपींनी त्यांचे म्हणणे अधिक पटवून देण्यासाठी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केले ज्यामध्ये गणवेशातील व्यक्ती ऑफिसच्या आत बसल्याचे दाखवले गेले. महिलेवर मानसिक दबाव आणण्यात आला आणि तिला डिजिटल पद्धतीने अटक करण्यात आली, म्हणजेच तिला घराबाहेर पडू नये, कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क साधू नये आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश देण्यात आले. जर तिने सूचना पाळल्या नाही तर तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या देण्यात आल्या.

फसवणूक करणाऱ्यांनी सततच्या मानसिक दबावाखाली तिचे आधार तपशील, बँक माहिती आणि इतर गोपनीय कागदपत्रे मिळवली. विकास नगर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या मामा चौराहा शाखेत खाते असलेली ही महिला मुदतपूर्व एफडी तोडण्यासाठी तिथे पोहोचली. रक्कम मोठी असल्याने, बँक कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण शाखा व्यवस्थापकाकडे नेले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच, व्यवस्थापकाने अंतर्गत तपासणी केली, पोलिसांना कळवले आणि तिची इतर बँक खातीही गोठवली. दरम्यान, पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत, पोलिस पथकाने संबंधित बँकांशी तात्काळ समन्वय साधला आणि सायबर सेलला माहिती दिली. महिलेचे समुपदेशन करण्यात आले आणि तिला सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून लक्ष्य केले जात असल्याची जाणीव करून देण्यात आली.

Exit mobile version