मुंबईतून डिजिटल अटकेचे प्रकरण उघडकीस आले असून यात एका महिलेने ३.७१ कोटी रुपये गमावल्याचे समोर आले आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका ६८ वर्षीय महिलेने पोलिसांना तक्रार केली आहे की, एका डिजिटल अटक प्रकरणात तिने तिच्या आयुष्यभराची ३.७१ कोटी रुपयांची बचत गमावली. चोरट्यांनी बनावट ऑनलाइन न्यायालयीन सुनावणी दाखवून आणि ‘डीवाय चंद्रचूड’ नावाचा वापर करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
घोटाळेबाजांनी महिलेला खात्री पटवून दिली की, तिची एका मोठ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. तसेच महिलेने त्यांच्या सूचनांचे पालन केले नाही तर तिला अटक होण्याची शक्यता आहे. एफआयआरनुसार, हे सर्व १८ ऑगस्ट रोजी सुरू झाले. माहितीनुसार, धनलक्ष्मी सत्यनारायण राव नायडू यांना विजय पॉल नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. तेव्हा त्यांनी सांगितले की, त्यांचा फोन कुलाबा पोलिस स्टेशनशी जोडलेला आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या नंबरवरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आले. कुलाबा पोलिसातील एस के नावाच्या एका व्यक्तीने सांगितले की, महिलेचे आधार कार्ड कॅनरा बँकेत ६ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहारांसाठी खाते उघडण्यासाठी वापरले गेले आहे. यामुळे त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला सुरू झाला आहे.
या सर्व बनावट कहाणीमध्ये अधिक खात्रीशीर वाटावे यासाठी त्याने महिलेला एक कागदपत्र पाठवले ज्यामध्ये असे म्हटले होते की ‘नरेश गोयल’ नावाच्या व्यक्तीला त्याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तिला इशारा देण्यात आला होता की जर तिने सहकार्य केले नाही तर तिला आणि तिच्या कुटुंबाला कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते. तिला ही माहिती कोणालाही सांगू नये असे देखील सांगण्यात आले होते. त्यानंतर महिलेला सांगण्यात आले की तिच्यावर २४ तास देखरेख ठेवण्यात आली आहे आणि लवकरच हे प्रकरण सीबीआय ताब्यात घेईल. तसेच या प्रकरणाची लवकरच सुनावणी होईल.
पुढे न्यायाधीशांच्या पोशाखातील एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर आला आणि त्याने स्वतःची ओळख “न्यायाधीश चंद्रचूड” अशी करून दिली. या प्रकरणात तिला जामीन द्यायचा की नाही हे तोच ठरवेल असे तिला सांगण्यात आले. या कथित सुनावणीपूर्वी, ‘एसके जयस्वाल’ अशी ओळख देणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने तिला तिच्या आयुष्याबद्दल दोन ते तीन पानांची एक चिठ्ठी लिहिण्यास सांगितले जेणेकरून तिची पार्श्वभूमी तपासता येईल. तसेच महिलेला आश्वासन देण्यात आले की, जर ती निर्दोष आढळली तर तिला कोणत्याही विलंबाशिवाय जामीन मंजूर केला जाईल.
हेही वाचा..
बांगलादेशात हिंदू कामगाराची गोळी झाडून केली हत्या
पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
पोलीस चकमकीत खुनाचा आरोपी जखमी
ममता बॅनर्जी यांच्या विचारांवर जिहादी घटकांचा ताबा
कथित व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान, न्यायाधीश म्हणून समोर असलेल्या व्यक्तीने महिलेला मनी लाँड्रिंग प्रकरणाबद्दल प्रश्न विचारले. जेव्हा तिने सांगितले की तिने काहीही चूक केली नाही, तेव्हा त्याने तिला सांगितले की तिचा जामीन नाकारण्यात आला आहे आणि अचानक फोन बंद केला. यामुळे तिला भीती वाढली की पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करतील. त्यानंतर फोन करणाऱ्यांनी तिला सांगितले की, तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पैसे देणे. महिलेला तिच्या बँक बॅलन्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंगपैकी ९० ते ९५% रक्कम आरटीजीएसद्वारे सुरक्षित खात्यांमध्ये हस्तांतरित करण्याचे सांगण्यात आले आले. पोलिस आणि न्यायालयाच्या खऱ्या सूचनांचे पालन करत असल्याचे मानून, महिलेने तिच्या सर्व बँक खात्यांची माहिती शेअर केली. यासोबतच १८ ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काळात, महिलेने चोरट्यांच्या सुचनेने एकूण ३.७१ कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. जेव्हा कॉल करणाऱ्यांनी आणखी पैसे मागायला सुरुवात केली आणि अटकेची धमकी देणे सुरू ठेवले तेव्हा महिलेले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
