मुंबई महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून घातला ३३ लाखांचा गंडा

मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली येथील ४३ जणांची केली फसवणूक

मुंबई महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून घातला ३३ लाखांचा गंडा

मुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देतो सांगत तब्बल ४३ जणांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली येथील अनेकांना नोकरीचे प्रलोभन देऊन आरोपींनी ३३ लाखांचा गंडा घातला आहे. शिवाय हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत कुर्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सांगलीतील रहिवासी असलेले आणि शेतीचे काम करणारे अनिलकुमार गाँजारी (५०) यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची ओळख माया चव्हाण (५९) हिच्याशी जून २०२४ मध्ये नातेवाइकांमार्फत झाली. संबंधित महिला ही पालिका (एल. वॉर्ड, कुर्ला) येथे कार्यरत असल्याचे सांगत होती. तिने पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचा दावा केला आणि पालिकेत विविध पदांसाठी नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले.

शिपाई, लिपिक, आर. ए. लिपिक व हेड क्लार्क पदांसाठी १.७० लाख ते २.५० लाख रुपये घेण्यात येतील, असे सांगण्यात आले. सुरुवातीला फॉर्म फीच्या नावाखाली रक्कम घेतल्यानंतर उमेदवारांकडून कागदपत्रे मागविण्यात आली. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडून १० हजार रुपये रोख स्वरूपात घेण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने सांगितले की, ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान विविध बँक खात्यांवर ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे २४ लाख ६८ हजार पाठविण्यात आले. तसेच मुंबईत प्रत्यक्ष भेटीदरम्यान ८ लाख ३० हजार रुपये रोख दिले.

हे ही वाचा:

डाव्यांचा जेएनयूत थयथयाट; अभाविपच्या सदस्याच्या डोळ्यात फेकली पूड

“राहुल गांधींनी इंडी आघाडीची सूत्रे ममता बॅनर्जींकडे सोपवावीत”

… म्हणून सिंगल- सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड!

मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया एल मेंचो मेक्सिकोमधील लष्करी कारवाईत ठार

संबंधित महिला प्रत्यक्षात महानगरपालिकेत शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. इतर आरोपींनीही बनावट ओळखपत्रे आणि शिक्के वापरून स्वतःला अधिकारी म्हणून भासविल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव, राहुल जाधव (स्वतःला बीएमसी अभियंता म्हणवणारे) व इतरांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कुर्ला पोलिस ठाण्याकडून प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपास सुरू आहे. यामध्ये बनावट कागदपत्राद्वारे विश्वास संपादन करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. तसेच चव्हाण ही महिला सेवानिवृत्त झाली असल्याची माहितीही तक्रारदार यांना मिळाली आहे.

Exit mobile version