वकीलासोबतच्या आर्थिक वादातून त्रस्त झालेल्या कणकवली येथील एका व्यक्तीने थेट मुंबई उच्च न्यायालयाबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेत संबंधित व्यक्ती ५० ते ६० टक्के भाजली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना तातडीने जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकाश सावंत (५५, रा. नरडवे, ता. कणकवली) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त असून, जमीन संपादनाचा मोबदला न मिळाल्याने तसेच वकिलाकडे दिलेली रक्कम पूर्णपणे परत न मिळाल्याने ते मानसिक तणावाखाली होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कणकवली येथील तहसीलदार कार्यालयात हक्कसोडीच्या प्रकरणात सावंत यांच्याकडून पाच ते सहा वेळा कागदपत्रे लिहून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली गेली नसल्याने सावंत यांनी २०२१ मध्ये न्यायालयात दाद मागण्यासाठी एका वकिलाला ६ लाख ८० हजार रुपये दिले होते. मात्र ही रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे संबंधित वकिलाविरोधात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा:
घोरण्याची समस्या दूर करून श्वसन तंत्र मजबूत करा
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर काय ?
ईडीकडून मालब्रोस इंटरनॅशनलची मालमत्ता जप्त
न्यायालयाच्या सूचनेनंतर वकिलाकडून ६ लाख रुपये परत मिळाले; मात्र उर्वरित ८० हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचे सावंत यांनी एका पत्रकात नमूद केले होते. पाटबंधारे प्रकल्पासाठी जमीन गेली असूनही मोबदला न मिळाल्याचा उल्लेख करत, काही अघटित घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी पत्रकात म्हटले होते.
सोमवारी न्याय मागण्यासाठी सावंत मुंबई उच्च न्यायालयात आले होते. त्याच दरम्यान त्यांनी अचानक स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तत्काळ आग विझवत त्यांना उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची नोंद आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
