दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने संघटित पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाहन कर्ज फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खोट्या उत्पन्नकर विवरणपत्रांच्या (ITR) आधारे विविध बँकांकडून वाहन कर्ज घेतले आणि जाणूनबुजून त्याची परतफेड केली नाही. या कारवाईत मर्सिडीजसह एकूण पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत. क्राईम ब्रँचने रविवारी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, २५ डिसेंबर रोजी सायबर सेलला या संघटित टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर निरीक्षक संदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून सातत्याने नजर ठेवणे, तांत्रिक विश्लेषण आणि फील्ड तपासणीद्वारे चौकशी सुरू करण्यात आली. ही टीम एसीपी अनिल शर्मा यांच्या देखरेखीखाली कार्यरत होती.
तपासात उघड झाले की कर्जाची रक्कम वितरित झाल्यानंतर आरोपी जाणूनबुजून हप्त्यांचे पैसे भरत नव्हते, त्यामुळे कर्ज एनपीए घोषित होत असे. तसेच वाहनांची वेगवेगळ्या राज्यांत पुन्हा नोंदणी करून ट्रॅकिंगपासून बचाव केला जात होता. तपासादरम्यान हेही निष्पन्न झाले की आरोपी अमन कुमारने राहुल कपूर, श्याम सुंदर आणि राय कपूर अशा अनेक बनावट नावांनी ओळख निर्माण करून बँक खाती उघडली आणि त्याच आधारे वाहन कर्ज घेतले. आधार आणि पॅन कार्डच्या विश्लेषणात वेगवेगळ्या नावांवरील सर्व ओळखपत्रांवरील छायाचित्रे एकाच व्यक्तीची असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा..
एलन मस्क करणार ‘एक्स’चा नवा अल्गोरिदम सार्वजनिक
एस. जयशंकर यांनी फ्रान्स व लक्झेंबर्ग दौऱ्यात कशावर भर दिला?
मैथिली ठाकूर यांचा मुंबईत रोड शो
मिळालेल्या माहितीनुसार अमन कुमारच्या टिळक नगर येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला, तेथून बनावट कागदपत्रे आणि वाहनांशी संबंधित नोंदी जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्याला २५ डिसेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली. आरोपीची ओळख अमन उर्फ श्याम सुंदर उर्फ राहुल कपूर (४६) अशी झाली आहे. तो दिल्लीतील टिळक नगरचा रहिवासी आहे. चौकशीत त्याने कबूल केले की तो अनेक वर्षांपासून बनावट नावे, पत्ते आणि ओळख वापरत होता. त्याने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खोट्या ITR च्या आधारे बँक खाती उघडली, वाहन कर्ज घेतले आणि नंतर वाहने विकून टाकली. या प्रकरणी क्राईम ब्रँच पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4)/336/338/340/112/61(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात ८ जानेवारी रोजी क्राईम ब्रँचने धीरज उर्फ आलोक उर्फ सिद्धार्थ याला अटक केली. चौकशीत त्याने सांगितले की तो अमनसोबत मिळून आलोक आणि सिद्धार्थ अशा बनावट नावांनी बँक खाती उघडत असे आणि त्याच खात्यांवरून वाहन कर्ज घेत असे. नंतर वाहने विकली जात. धीरजने पुढे सांगितले की बनावट आधार कार्ड नजफगढ येथील साई डॉक्युमेंट्स सेंटरमध्ये तयार केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी त्या दुकानावर छापा टाकून दुकानमालकाला अटक केली. या प्रकरणातील तिसरा आरोपी म्हणून ९ जानेवारी रोजी नरेश कुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोबाईल फोन, आय-स्कॅनर, बायोमेट्रिक स्कॅनर, वेब कॅमेरा आणि पीव्हीसी कार्ड मशीन जप्त करण्यात आली आहे.
