हिंदू नाव धारण करून नवी मुंबईत राहणाऱ्या एका बांग्लादेशी दाम्पत्याला राज्य एटीएसने नुकतीच अटक केली आहे. या दाम्पत्याकडे सापडलेल्या आधारकार्ड तसेच इतर दस्तावेजावर त्यांनी हिंदू नावाचा उल्लेख केला असून हे सर्व दस्तावेज बनावट असल्याचे तपासात समोर आले आहे. एटीएसने या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
रंजन सत्यरंजन दास उर्फ अस्लम अब्दुल कुद्दूस शेख (३५) आणि मलिना रंजन दास उर्फ हुस्ना अस्लम शेख (३४) असे अटक करण्यात आलेल्या या संशयित दांपत्याची नावे आहेत. हे दोघे मूळचे बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील नागरिक आहेत.
एटीएसच्या नवी मुंबई युनिटने ही कारवाई केली असून या दाम्पत्याकडून एटीएसने आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका, मतदान कार्डसह काही संशयास्पद कागदपत्रे मिळून आली आहे. या दाम्पत्यावर मागील काही दिवसांपासून एटीएसने पाळत ठेवली होती. या दोघांना अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी प्रथम ते हिंदू असल्याचे सांगून एटीएसची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्याकडे मिळालेल्या कागपत्रावरून त्यांचे पितळ उघडे पडले.
हे ही वाचा:
कॉंग्रेस-समाजवादी पक्षातील युती संपुष्टात
अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड
चंडीगडच्या महापौरपदाच्या निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे!
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली संदेशखालीतील पीडितांची भेट!
या कागदपत्राच्या आधारावर एटीएसने या दांपत्यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली. अधिक चौकशीत यांची खरे नावे अब्दुल कुद्दूस शेख आणि हुस्ना अब्दुल शेख अशी असून हे दोघे मूळचे बांग्लादेशी नागरिक असून मागील चार वर्षापासून पनवेल येथे बेकायदेशीररित्या राहत होते.
२०१६ मध्ये अब्दुल शेख हुस्नाच्या संपर्कात आला, जो मूळचा बांगलादेशातील नोडेल जिल्ह्यातील आहे. शेख आणि हुस्ना यांनी त्याच वर्षी लग्न केले. या जोडप्याने आपली खरी ओळख लपविण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र आणि बोगस नावांवर शिधापत्रिका खरेदी केली होती. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी हे इंटरनेट कॉलिंग मोबाईल ऍप्लिकेशन वापरून बांगलादेशातील नागरीकांच्या संपर्कात होते. हे दोघे नक्की कुणाच्या संपर्कात होते, दोघांचा हेतू काय होता याचा तपास सुरू आहे. या दोघांकडे मिळून आलेल्या बोगस दस्तावेज प्रकरणी एटीएसने भारतीय दंड संहिता कलम ३४ (सामान्य हेतूने अनेकांनी केलेली कृत्ये), ४२०(फसवणूक), ४६५ (बनावट दस्तावेज), ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट दस्तावेज ) आणि ४७१ नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
